किशोर कुबल,पणजी : मतदान करण्याआधी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदारांच्या बोटाला लावली जाणारी शाई काही वेळेतच गायब होत असल्याच्या तक्रारी अनेक मतदारांनी केल्या.काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून पणजी विधानसभा मतदार संघातील बूथ क्रमांक आठवर असे अनेक प्रकार घडल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणले आहे.
पणजी महापालिकेच्या माजी नियुक्त नगरसेविका पेट्रिसिया पिंटो यांनीही हा अनुभव सांगितला आहे. मतदान करून आल्यानंतर घरात धुणी भांडी केल्यावर हातावरील शाई गायब झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
उत्तर गोवा मतदारसंघातील एका विशिष्ट मतदान केंद्रातून शाई गायब झाल्याच्या तक्रारी अनेक सोशल मीडिया हँडलवर आल्या आहेत. या संदर्भात जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घटनांची पाहणी करून असे वृत्त दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. शाई खरोखरच अमिट आणि दीर्घकाळ टिकणारी असल्याचा दावा आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
पल्लवी व सिद्धेश नाईकविरुद्ध आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार-
दरम्यान, काँग्रेसने दक्षिण गोवा भाजप उमेदवार पल्लवी धेंपे तसेच श्रीपाद नाईक यांचे उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धेश नाईकविरुद्ध आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार आयोगाकडे सादर केली आहे. पल्लवीविरुद्धच्या तक्रारीत पणजी मतदारसंघातील बूथ क्रमांक १५ आणि ११ मधून भाजपला मतदानाचे आवाहन केल्याचा आरोप आहे. दुसऱ्या तक्रारीत असा आरोप आहे की नाईक यांनी सांपेद्र येथील मतदान केंद्रावर असताना भाजपच्या बाजूने संदेश असलेला टी-शर्ट घातला होता.