गोव्यात कुठेच एकतर्फी लढत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 12:37 PM2019-04-04T12:37:58+5:302019-04-04T12:42:29+5:30
उत्तर आणि दक्षिण गोवा असे दोन लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. एकूण पाच मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात यावेळी निवडणूक एकतर्फी नाही.
पणजी - उत्तर आणि दक्षिण गोवा असे दोन लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. एकूण पाच मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात यावेळी निवडणूक एकतर्फी नाही. सर्व मतदारसंघांतील निवडणुकांमध्ये चुरस आहे.
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. बहुतेक काँग्रेस उमेदवार दक्षिण गोव्यातून निवडून यायचे. त्या मतदारसंघातील सासष्टी तालुक्यात ख्रिस्ती मतदारांची संख्या बरीच मोठी असल्याने काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग सोप होत असे. मात्र यावेळी काँग्रेसने 73 वर्षीय फ्रान्सिस सार्दिन यांना तिकीट दिलं व सार्दिन यांचा प्रचार थोडा उशिराच सुरू झाल्याने त्यात जोष दिसून येत नाही. दक्षिण गोव्यात भाजपाचा उमेदवार फक्त दोनवेळा जिंकला. एकदा रमाकांत आंगले जिंकले होते व 2014 साली मोदी लाटेमुळे नरेंद्र सावईकर हे जिंकले. मात्र यावेळी सावईकर हे सार्दिन यांना जोरदार टक्कर देत आहेत. शिवाय आम आदमी पक्षाचे एल्वीस गोम्स हेही महत्त्वाचे उमेदवार आहेत. तेही ख्रिस्ती व हिंदू मते प्राप्त करतील. ख्रिस्ती मते जर त्यांनी जास्त प्राप्त केली तर सार्दिन यांच्यासाठी ती चिंतेची गोष्ट ठरू शकते. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर हे सार्दिन यांचा प्रचार करत आहेत. भाजपाचे सावईकर यांच्या प्रचारात मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे उतरले आहेत.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक हे भाजपाचे उमेदवार आहेत. नाईक हे पाचव्यांदा निवडणुकीला सामोरे जात असल्याने उत्तरेत भाजपा कार्यकर्त्यांमधील जोष थोडा कमी दिसतो. त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे उमेदवार बनून टक्कर देत आहेत. नाईक हे लोकसभा निवडणुकीत कधीच हरलेले नाहीत ही भाजपाची जमेची बाजू आहे. मात्र चोडणकर यांनी प्रचाराच्या नवनव्या कल्पना राबविणो सुरू केले आहे. त्यांनी नुकतीच सायकल रॅलीही काढली.
मांद्रे, म्हापसा व शिरोडा या तीन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका आहेत. यापैकी शिरोडामध्ये भाजपाविरुद्ध मगोप अशी कडवी झुंज आहे. माजी मंत्री महादेव नाईक हे तिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत. म्हापशात माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचा पुत्र जोशुआ हा भाजपतर्फे रिंगणात उतरला आहे. काँग्रेसने अनुभवी नगरसेवक सुधीर कांदोळकर यांना रिंगणात उतरविले तरी, काँग्रेस पक्ष गेली 39 वर्षे म्हापशात कधी जिंकलेला नाही. 1980 साली काँग्रेस (अर्स) चा एकदाच विजय झाला होता. काँग्रेसने सुधीर कांदोळकर यांना तिकीट दिले असून कांदोळकर हे भाजपामधून बाहेर आले तरी, भाजपाचे जास्त कार्यकर्ते फुटले नाहीत. तरीही म्हापशात अटीतटीची लढत आहे. मांद्रे मतदारसंघात माजी आमदार दयानंद सोपटे आणि प्रथमच विधानसभा निवडणूक लढवणारे काँग्रेसचे बाबी बागकर व अपक्ष जित आरोलकर यांच्यात खरी लढत आहे.