पणजी - गोव्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची येत्या 10 एप्रिल रोजी दोनापावल येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सायंकाळी 4.30 वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पूर्वी 12 एप्रिल रोजी ठरली होती. त्यात बदल करण्यात आला असून आता ही दोन दिवस आधी 10 एप्रिल रोजी सायंकाळी होणार आहे. तेंडुलकर म्हणाले की, काही सेलिब्रिटीही प्रचारासाठी येणार असून 8 नंतरच तारखा निश्चित होतील.
गोव्यात येत्या 23 रोजी निवडणुका होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह शिरोडा आणि म्हापसा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतील. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दक्षिण आणि उत्तर गोव्यात दोन वेगळ्या जाहीर सभा घेतील. गडकरी आणि स्मृती इराणी याही प्रचारात उतरणार आहेत या सभांच्या तारखा मात्र निश्चित व्हायच्या आहेत. लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून भाजपातर्फे श्रीपाद नाईक तर दक्षिण गोव्यातून नरेंद्र सावईकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. विधानसभा पोटनिवडणुकांसाठी पक्षातर्फे आज मागच्या म्हापशातून जोशुआ डिसूजा तर मांद्रेतून दयानंद सोपटे यांनी उमेदवारी अर्ज भरला. सोपटे यांच्यासोबत अर्ज भरताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा गेल्या महिन्यात गोव्यात व्हावी असा प्रयत्न झाला होता पण सभा होऊ शकली नाही. गोव्यात तिसऱ्या मांडवी पुलाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान येतील असेही सरकारने अगोदर जाहीर केले होते पण पुलाच्या उद्घाटनाला मोदी पोहचले नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन केले गेले. मध्यंतरी खनिज खाण अवलंबितांनी पंतप्रधानांना खाण बंदीविषयी प्रश्न विचारण्याचे ठरविले होते. मात्र पंतप्रधान गोव्यात न पोहचल्यामुळे प्रश्न विचारता आला नाही. नंतरच्या काळात दिल्लीत खाण अवलंबितांना पंतप्रधानांची भेट मिळाली पण त्या भेटीतून काही निष्पन्न झाले नाही.