काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला कोण सुरुंग लावणार? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 03:07 PM2023-12-11T15:07:05+5:302023-12-11T15:08:00+5:30

सासष्टीत प्रभाव निर्माण करण्यासाठी भाजप, आरजीचा खटाटोप

lok sabha election 2024 and goa congress politics | काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला कोण सुरुंग लावणार? 

काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला कोण सुरुंग लावणार? 

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : सासष्टी हा काँग्रेसचा बालेकिल्ला. आतापर्यंत सासष्टी तालुक्यानेच काँग्रेसला तारले आहे. मात्र, या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे आरजी व भाजपकडून आटोकाट प्रयत्न चालू आहेत.
या तालुक्याचा आढावा घेतल्यास यंदा येथील मतदार काँग्रेसबरोबर राहण्याची शक्यता तशी धूसर आहे. त्यांचा कल आरजीकडे वळू लागला आहे.

दिगंबर कामत व आलेक्स सिक्वेरा हे आता भाजपमध्ये आहेत. सिक्वेरा यांना तर मंत्रिपदही मिळाले आहे. आरजीने गत विधानसभा निवडणुकीत सासष्टीत बऱ्यांपैकी मते प्राप्त करताना काँग्रेसला शह दिला होता. लोकसभा निवडणुकीत सासष्टीची भूमिका पुन्हा एकदा महत्त्वाची ठरणार आहे.

सासष्टी हा ख्रिस्ती अल्पसंख्याक बहुल तालुका आहे. मात्र, आता या समाजातील अनेकजण परदेशात स्थायिक झाले आहेत. त्यातच मतदारसंघ फेररचनेमुळे या तालुक्यातील काही मतदारसंघाचे धुव्रीकरणही झाले आहे. नुवे, बाणावली व काही प्रमाणात वेळ्ळी मतदारसंघापुरतेच खिस्ती लोकांचे वर्चस्व अजूनही आहे. 

मागच्या खेपेला दक्षिण गोवालोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दीन यांनी निवडणूक लढविली होती. त्यांनी एकूण २०,१५६१ मते मिळविली होती. सार्दीन यांनी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर पुन्हा एकदा आपण दक्षिणेतून निवडणूक लढवू व ही आपली आयुष्याची शेवटची निवडणूक असेल, अशी भावनात्मक भाषा यापूर्वीच ते बोलूनही गेले आहेत.

सार्दिनकडे युवा मतदार वळणार?

सार्दीन हा जुना चेहरा आहे. त्यांचे आता वयही झाले आहे. मात्र, त्यांना मानणारा एक वर्ग अजूनही सासष्टीत आहे. त्यांचा तसा लोकसंपर्कही चांगला आहे. या त्यांच्या काही जमेच्या गोष्टी आहेत. मात्र, आजचा युवा मतदार त्यांना जवळ करणार का? हा मोठा प्रश्न आहे.

मतदार मागे राहणार का?

मडगाव, फातोर्डा व नावेली मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या जास्त आहे. काँग्रेसकडे उमेदवार असले तरी या पक्षाचे कुठलेही संघटनात्मक काम या तालुक्यात दिसत नाहीत. त्यामुळे मतदार त्यांच्या मागे राहणार का? हाही एक प्रश्न आहे.

गिरीश, एल्वीस यांचीही नावे चर्चेत

गिरीश चोडणकर व एल्वीस गोम्स हेही सासष्टीचे आहेत. या दोघांनाही निवडणूक लढविण्याचा अनुभव आहे. पराभव झालेला असला तरी हे दोघेही राजकारणात अजूनही सक्रिय आहेत. गिरीशने तर आतापासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासही सुरुवात केली आहे. ख्रिस्ती लोकांमध्येही त्यांच्याबाबत चांगले मत आहे. त्याचा लाभ करून घेण्यात ते यशस्वी ठरतील का?, गोम्स स्वतः ख्रिस्ती आहेत. काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर अल्पसंख्यक मते खेचू शकतात का, तेही पाहावे लागेल.

अल्पसंख्याक याही खेपेला काँग्रेसच्या बाजूने

सासष्टी तालुक्यातील अल्पसंख्याक याही खेपेला काँग्रेसच्या बाजूने राहणार, त्यांना पर्याय नाही. काँग्रेस हाच भाजपचा विरोधी पक्ष आहे. भाजपने कितीही विकासकामे केली असल्याचे सांगितले तरी कुठल्याही पक्षाचे सरकार असो ते विकासकामे करणारच. भाजप हिंदुत्व ही राष्ट्रीय संस्कृती मानत आहे. जो त्यांच्याविरोधात बोलतो ते अराष्ट्रीय, आमच्या गोव्याची व देशाची विविधता ही आमची संस्कृती आहे, आणि ती अतिशय महत्त्वाची आहे. - प्रभाकर तिंबले, राजकीय विश्लेषक.

 

Web Title: lok sabha election 2024 and goa congress politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.