लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : तिसवाडी तालुक्यात सांत आंद्रे वगळता इतर चारही मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या तालुक्यात भाजप उमेदवारासाठी ती जमेची बाजू असली तरी सांताक्रुझ, कुंभारजुवें आदी मतदारसंघांमध्ये काही कष्ट भाजपला घ्यावे लागतील.
पणजी व ताळगावमध्ये मंत्री बाबुश मोन्सेरात पक्षाच्या उमेदवाराला मते मिळवून देतील. दोन्ही मतदारसंघात आरजीचा तेवढा प्रभाव नाही. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्याच्या बाबतीत मात्र आरजी आघाडीवर आहे. पक्षाचे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले असून केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आरजीने ताळगांवमध्ये १६२८ मते मिळवली होती.
सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस हे सध्या भाजपात आहेत. पब्रुवारी २०२२ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती व ते काँग्रेसतर्फे निवडून आले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार टोनी फर्नाडिस यांचा २४६४ मतांनी पराभव केला होता. हा मतदारसंघ खिस्तीबहुल आहे. या मतदारसंघात काँग्रेसची पारंपरिक मते आहेत. रुडॉल्फ किती मते भाजपकडे वळवतात हे पहावे लागेल. सांत आंद्रेत आरजीचे वीरेश बोरकर येथे केवळ ७६ मतांनी निवडून आले. तेथेत बोरकर यांनी कामाचा धडाका लावलेला आहे. सांत आंद्रेतील आरजीचा विजय हा गोव्यातील जनतेबरोबरच तमाम बड्या राजकीय पक्षांनाही आश्चर्यजनक ठरला होता. काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर होता.
कुंभारजुवेंत काँग्रेसची पारंपरिक मते
कुंभारजुवेंचे आमदार राजेश फळदेसाई हेही काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. गेल्या वर्षी आठ काँग्रेसी आमदार फुटून भाजपात आले त्यात फळदेसाई यांचाही समावेश होता. ते आता भाजपमध्ये आहेत, या मतदारसंघातही काँगेसची पारंपरिक मते आहेत.