- मगन कळलावे
२०२९ साल कुणी पाहिले आहे? त्यापूर्वी व त्यावेळी काय घडेल, याची कल्पना आताच कुणी करू शकत नाही, जग झपाट्याने बदलतेय. आपले उत्तर गोव्याचे श्रीपादभाऊ यांना काय विनोदबुद्धी सुचली कोण जाणे, पण म्हापशात काल त्यांनी भलतेच विधान केले. नुकतेच कुठे २०२४ साल सुरू झाले आहे आणि भाऊ चक्क २०२९ सालाविषयी बोलले. २०२९ मध्ये जी लोकसभा निवडणूक येईल, त्या निवडणुकीवेळी उत्तर गोव्यात भाजपने नवा युवा उमेदवार द्यावा, असे भाऊंनी सुचविले आहे.
उत्तर गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे आणखी किती मनोरंजन करणार 'भाऊ? २०२९ साल यायला आणखी पाच वर्षे आहेत. तत्पूर्वी मांडवी आणि जुवारी नदीतून बरेच पाणी वाहून जाईल. कदाचित श्रीपादभाऊंना २०२९ मध्ये वाटू शकते की, आपण अजून युवा आहे, असे काही कार्यकर्ते विनोदाने बोलतात. २०२९ मध्ये भाजपने नवा युवा उमेदवार द्यावा, असे केंद्रीय राज्यमंत्री असलेले भाऊ सुचवतात. मग आताच नवा युवा उमेदवार उत्तर गोव्यासाठी का नको, असा प्रश्न आरजीवाले विचारतात म्हणे, आरजीतर्फे मनोज परब रिंगणात उतरले आहेतच. २०२९ पर्यंत नव्या युवा उमेदवारासाठी लोकांनी का थांबावे? मतदारांसमोर आताच नव्या युवा उमेदवाराचा पर्याय नको काय?
श्रीपादभाऊंचे नशीब की यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे तिकीट कापले नाही. अनेक विद्यमान खासदारांना यावेळी तिकीट गमवावे लागत आहे. दिल्लीचे डॉ. हर्षवर्धन हे एकेकाळी भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होते. त्यांना यावेळच्या निवडणुकीसाठी गुडबाय केले गेले आहे, आपल्याला तिकीट नको, असे यावेळी त्यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सांगितले आहे. कारण त्यांना तिकीट मिळणार नाही, हे कळाले होते.
श्रीपादभाऊंना आमच्यामुळे तिकीट मिळाले, असे म्हणे सदानंदराव तानावडे सध्या बार्देश तालुक्यात आपल्या काही खास माणसांना सांगतात. तसे सांगताना तानावडेंच्या चेहऱ्यावर खास हास्य विसावते. दक्षिण गोव्यात पुरुष उमेदवार नको, एखाद्या महिलेला तिकीट द्यावे, असे पंतप्रधान मोदी यांनी सुचविले. मोदींचा हा आदेश ऐकून मुख्यमंत्री प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष तानावडे या दोघांच्याही तोंडचे पाणी पळाले. बाबू कवळेकर, नरेंद्र सावईकर वगैरे तर घामाघूम झाले आहे. 'हेची फळ का मम तपाला', असे नरेंद्रबाब विचारतात. दामू नाईक बिचारे थांबलेत की, यापुढे भाजप प्रदेशाध्यक्षपद तरी मिळेल. तानावडे मात्र राज्यसभा खासदार झाले तरी प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तसे मनातून तयार नाहीत. असो, त्यालाच त्याग म्हटले श्रीपादभाऊ जाते. एरव्ही त्यागाच्या गोष्टी करतात. देशासाठी त्याग करायला हवा, असा सल्ला ते युवकांना देतात. मात्र भाऊंनी यावेळी आपल्याला तिकीट मिळायलाच हवे म्हणून आकाशपाताळ एक केले.
पाच लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर व केंद्रात मंत्रिपदही अनुभवल्यानंतर सत्तेची नशा काय असते, हे भाऊंना कळाले आहे. त्याग वगैरे नंतर पाहू. तरी बरे श्रीपादभाऊ २०२९ साली त्याग करणार आहेत. त्यावेळी नवा युवा उमेदवार भाजपने द्यायला हवा म्हणे, आता २०२९ साली दयानंद सोपटे, दया मांद्रेकर किंवा आपले दिलीप परुळेकर तरी युवावस्थेत असतील काय? परुळेकर आताच थकलेले आहेत.
आपली यावेळची निवडणूक ही शेवटची आहे, असे अनेक राजकारणी सांगत असतात. एकदा लोकांचे मतदान झाले की, मग भाषा बदलली जाते. यावेळी आपण अखेरची लोकसभा निवडणूक लढवतोय, असे भाऊ थेट बोलले नाहीत. पण २०२९ मध्ये तुम्ही नवा उमेदवार शोधा, असे भाऊंनी सुचवले आहे. पूर्वी स्व. मनोहर पर्रीकर वगैरे सांगायचे की, २०१२ च्या निवडणुकीनंतर आपण राजकारणातून रिटायर होणार आहे. मात्र तसे काही घडले नाही. रिटायर होऊन आपण शेती करीन, असे भाई सांगायचे. अर्थात तसे बोलायचे असते हे भाईंना ठाऊक होते. प्रतापसिंग राणे यांनी अकरा निवडणुका लढविल्या व जिंकल्या, तरी बारावी म्हणजे २०२२ ची निवडणूक लढवायची त्यांना इच्छा होतीच की.