Goa Lok Sabha Election 2024: लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : राज्य सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या 'स्वयंपूर्ण गोवा' उपक्रमाला निवडणूक आयोगाने ब्रेक लावला आहे. निवडणूक आचारसंहिता जारी झाल्यामुळे आता 'स्वयंपूर्ण गोवा' अंतर्गत कार्यक्रम बंद ठेवण्याचा आदेश देत आयोगाने सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर देशात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने मतदारांवर प्रभाव टाकणारे कार्यक्रम सरकारकडून करू नयेत, अशी अपेक्षा असते. विरोधकांनी तसा आक्षेप घेतल्यास निवडणूक आयोग सरकारला याबाबत कठोर आदेश देऊ शकतो. नेमके तशीच गोष्ट गोव्यात राज्य सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाच्या बाबतीत झाली आहे.
काँग्रेसने सरकारच्या विकसित भारत यात्रेला आक्षेप घेतला होता; परंतु निवडणूक आयोगाने विकसित भारत यात्रेच्या बाबतीत काहीच आदेश दिलेला नाही; पण स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाच्या बाबतीत कठोर निर्णय घेताना निवडणूक आचारसंहिता लागू होईपर्यंत हा उपक्रम स्थगित ठेवण्याचा आदेश दिला आहे. तसेच सर्व अधिकाऱ्यांना स्वयंपूर्ण मित्र म्हणून आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आदेशही दिले आहेत. यामुळे निवडणूक आचारसंहिता चालू असेपर्यंत तरी स्वयंपूर्ण मित्र बंद राहणार आहेत.
स्वयंपूर्ण गोवा' हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कल्पनेतील उपक्रम असून हा उपक्रम त्यांच्या फार जिव्हाळ्याचाही आहे. या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे कौतुकही केले होते. स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत अनेक नियोजित कार्यक्रम ठरले होते. त्यापैकी अनेक कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थिती लावणार होते; मात्र निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर आता ते सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
'विकसित भारत'चे काय?
आचारसंहिता भंगच्या तक्रारींचा ओघ सुरू झाला आहे. पहिली तक्रार काँग्रेसकडूनच करण्यात आली आहे. भाजपने सुरू केलेली विकसित भारत यात्रा ही आचारसंहितेचा भंग करीत असल्यामुळे ती बंद करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. काही काँग्रेस कार्यकर्त्यांनीच निवडणूक आयोगाकडे स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाविषयी तक्रारीही केल्या होत्या.
आचारसंहितेचा भंग, मांद्रेत गुन्हा दाखल
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी अज्ञातव्यक्तीवर गुन्हा दाखल केला. संशयित मतदारांना एका राजकीय पक्षाचे पत्रक वाटत असल्याचे पोलिसांना आढळून आले. तसेच निवडणूक आयोगाच्या फ्लाईंग स्क्वॉडला राजकीय पक्षांच्या बॅनरची माहिती देणारे फोन येत असून स्क्वॉड त्या ठिकाणी जाऊन बॅनर काढत आहे.