किशोर कुबल, पणजी: काँग्रसने तिकीट दिले नाही तरी मी पक्षासोबतच राहीन, असे लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोवा मतदारसंघातून तिकीटाचे दावेदार एल्विस गोम्स यांनी स्पष्ट केले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षाने मतदारांना गृहीत धरु नये. त्यामुळे त्यांचा विश्वास कमी होतो. उमेदवार जाहीर करण्याबाबत आज, उद्या करु नये. लवकरात लवकर तिकीट जाहीर करावे.
भाजपने दक्षिणेत पल्लवी धेंपे यांना उमेदवारी दिल्याबद्दल विचारले असता एल्विस म्हणाले की, भाजपने महिलेला तिकीट दिले ही त्यांची मर्जी. काँग्रेसने टक्कर देण्याची तयारी ठेवावी. प्रतिस्पर्धी उमेदवार कोणीही असो, आमचे मजबूत मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जायला हवे. आम्ही काय करणार आहोत, ते त्यांना सांगायला हवे, असे ते म्हणाले.
एल्विस यांनी अशी टीकाही केली की, भाजपाकडे प्रशासन नाही. केवळ निवडणुकीपुरतेच ते जागे होतात. सावंत सरकारने टॅक्सीवाल्यांना स्पीड गव्हर्नरची सक्ती करुन गोंधळात टाकले आहे. रस्ते सर्वचजण वापरतात. मग टॅक्सीवाल्यांनाच सक्ती का? काँग्रेस उमेदवार देण्यास विलंब लावत असल्याने लोक आम्हाला विचारतात. चार-पाच स्थानिक नेतेच पक्ष चालवतात. त्यांनाच या विलंबाबद्दल विचारले तर बरे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. दक्षिण गोव्यात उमेदवारीसाठी माझे नाव पूर्वीपासून आहे. गेले एक वर्ष मी झोकून देत काम करत आहे. काही स्थानिक नेत्यांना मी नको आहे. पक्षातीलच चार-पाच स्थानिक नेत्यांना माझ्यापासून धोका वाटतो. पण त्या भावनेचा फरक पडत नाही, असे ते म्हणाले.