दक्षिणेतील जागेबाबत उत्कंठा कायम; विजयी उमेदवाराची लीड कमी ठरेल अशीही चर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2024 08:06 AM2024-06-03T08:06:58+5:302024-06-03T08:08:44+5:30

नजरा निकालाकडे

lok sabha election 2024 result excitement about the place in the south goa remains it is also discussed that the lead of the winning candidate will be reduced | दक्षिणेतील जागेबाबत उत्कंठा कायम; विजयी उमेदवाराची लीड कमी ठरेल अशीही चर्चा 

दक्षिणेतील जागेबाबत उत्कंठा कायम; विजयी उमेदवाराची लीड कमी ठरेल अशीही चर्चा 

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : लोकसभा निवडणुकांचा निकाल आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असताना, कोण जिंकणार व कोण हरणार याबाबत सर्वांनाच उत्कंठा आहे. दक्षिण गोव्यातून भाजप वा काँग्रेस पक्षापैकी कुणीही जिंकून आला तरी त्याचे मताधिक्य हे कमीच असेल व निसटत्या फरकानेच विजयी उमेदवार बाजी मारेल अशी जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच २५ हजारांचे मताधिक्य मिळेल असा दावा केला होता.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ भाजपने कधी नव्हे एवढा या खेपेला प्रतिष्ठेचा बनविला होता. पक्षाने पल्लवी धंपे यांना उमेदवारी दिली होती. सुरुवातील अनेकांनी त्याबाबत नाकेही मुरडली होती. खुद्द पक्षातच नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, ही नाराजी दूर करून सर्वांनाच निवडणुकीच्या कामाला लावण्याचे कसब भाजपने दाखविले यात संदेह नाही. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे वांरवार दक्षिण गोव्यात येत होते. सासष्टीसारख्या काँग्रेसधार्जिण्या मतदारसंघातही मुख्यमंत्र्यांनी वारंवार दौरे केले. येथील अल्पसंख्याकाच्याही भेटी घेतल्या. आता या लोकांची किती मते भाजपला मिळाली हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात एकूण २० मतदारसंघ आहेत. यात फोंडा, शिरोडा, मडकई, मुरगाव, वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी, नुवे, कुडतरी, फातोर्डा, मडगाव, बाणावली, नावेली, कुंकळ्ळी, वेळ्ळी, केपे, कुडचडे, सावर्डे, सांगे व काणकोण मतदारसंघांचा समावेश आहे.
या खेपेला निवडणुकीत इंडिया आघाडीला आप व गोवा फॉरवर्डने पाठिंबा दिला होता. आपचे बाणावलीत वेन्झी व्हिएगस व वेळ्ळीत कुझ सिल्वा हे आमदार आहेत, तर फातोर्डात गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे आमदार आहेत. कुंकळ्ळी व केपेत अनुक्रमे काँग्रेसचे युरी आलेमाव व एल्टन डिकॉस्ता हे आमदार आहेत. मडकईत मगोचे सुदिन ढवळीकर, तर कुठ्ठाळीत अँथनी वाझ व कुडतरीत आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे अपक्ष आमदार आहेत. या तिघांचाही भाजपला पाठिंबा होता. अन्य मतदारसंघातील आमदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे कागदावर तरी दक्षिण गोव्यात या खेपेला भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे.

काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनीही आपला प्रचार नेटाने केला होता. मात्र, काँग्रेसची संघटनात्मक शक्ती खिळखिळी आहे. त्याउलट भाजपकडे कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. ही या पक्षासाठी जमेची बाजू ठरली आहे. सध्या तरी मतदार कोण जिंकेल याबाबत ठामपणे बोलून दाखवत नाहीत. लढत रंगतदार असून, ४ जूनकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

मडगावात बदलाचे वारे?

मडगाव पालिकेत बदलाचे वारे वाहू लागले आहे. मात्र, हे वारे नेमके कुठून येत आहे, हे कुणाला माहिती नाही. कोणीतरी ही हवा करीत आहे, हे मात्र नक्की. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या समर्थकांची पालिकेत सत्ता आहे. दामोदर शिरोडकर यांना नगराध्यक्षपद कामत यांच्याचमुळे प्राप्त झाले. परंतु फातोड्याचे आमदार विजय सरदेसाई यांचेही समर्थक नगरसेवक आहेत. आमदार कामत यांच्यावर नाराज असलेले काही नगरसेवक सरदेसाईंच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावतात. त्याना म्हणे सरदेसाईचे कार्य आवडते असे ते सांगतात. तर काहीनगरसेवक म्हणतात, आम्हाला सगळेचजण सारखेच. आम्ही कशाला कुणा जवळ वाईटपणा घ्यायचा?

दक्षिण गोव्याची लढत ही एकतर्फी नाहीच. जो उमेदवार जिंकेल त्याचे मताधिक्य जास्त असणार नाही. या घडीला अमकाच जिंकेल असे ठामपणे सांगणे अतिशयोक्ती ठरेल. मात्र, जो जिंकणार तो कमी फरकाने हे निश्चित. भाजप व काँग्रेस पक्षातच येथे लढत आहे. - प्रभाकर तिंबलो, राजकीय जाणकार

Web Title: lok sabha election 2024 result excitement about the place in the south goa remains it is also discussed that the lead of the winning candidate will be reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.