बार्देशवर पुन्हा श्रीपाद नाईक वर्चस्व राखण्याची शक्यता; काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2024 07:59 AM2024-06-03T07:59:58+5:302024-06-03T08:01:59+5:30

निवडणुकीदरम्यान नाईक यांच्याविरोधात अनेक मुद्दे उपस्थित केले गेले.

lok sabha election 2024 result shripad naik likely to dominate bardesh again lack of organizational work in congress | बार्देशवर पुन्हा श्रीपाद नाईक वर्चस्व राखण्याची शक्यता; काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्याचा अभाव

बार्देशवर पुन्हा श्रीपाद नाईक वर्चस्व राखण्याची शक्यता; काँग्रेसमध्ये संघटनात्मक कार्याचा अभाव

प्रसाद म्हांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : विक्रमी अशा सतत सहाव्यावेळी उत्तर गोव्याचे प्रतिनिधीत्व करण्याच्या दृष्टीने पुन्हा रिंगणात उतरलेले भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक यांना यावेळी लोकसभा निवडणुकीत बार्देश तालुक्यातून परिस्थिती अनुकूल दिसत नव्हती. तरीही पक्ष संघटनेच्या कार्याच्या जोरावर तेच पुन्हा आघाडी प्राप्त करून विजयी होतील, अशी चर्चा सुरू आहे.

निवडणुकीदरम्यान नाईक यांच्याविरोधात अनेक मुद्दे उपस्थित केले गेले. वाढलेली महागाई, निवडून आल्यानंतर पुन्हा मतदारांपर्यंत जाण्यास त्यांना आलेले अपयश, विकासकामांकडे दुर्लक्ष, अॅन्टी इन्कम्बन्सी, अल्पसंख्याक समाजातील मतदारांनी घेतलेली विरोधी भूमिका यासारखे विविध मुद्दे लोकांमध्ये चर्चेत होते. तसेच काँग्रेस पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यास झालेला विलंब, काँग्रेस पक्षात संघटनात्मक कार्याचा अभाव, विरोधी पक्षात एकजुटीचा अभाव याचा लाभ नाईक यांना होऊन तालुक्यातून पुन्हा तेच आघाडी मिळवणार आहेत. तसेच अयोध्येतील श्रीराम मंदिराचा मुद्दा तसेच केंद्रातील इतर अनेक निर्णय, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा तालुक्यातील झंझावती असा प्रचार दौरा नाईक यांच्यासाठी लाभदायी ठरला. मात्र, नाईक विजयी ठरणार असले तरी मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तालुक्यातून त्यांच्या मतांच्या आघाडीत घट होण्याची शक्यता आहे.

उत्तर गोव्यातून ८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत ही फक्त भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक तसेच काँग्रेसचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप यांच्यातच होणार आहे. आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब हे फक्त थिवीतून थोडाफार प्रतिकार करू शकतात. काँग्रेसचे उमेदवार खलप हे स्वतः बार्देश तालुक्यातील असल्याने निवडणुकीच्या दरम्यान ते किमान बार्देश तालुक्यातून नाईक यांच्यासमोर आव्हान उभे करणार अशी शक्यता भासत होती. मात्र, झालेल्या मतदानानंतर तीही फोल ठरली. आपला तसेच पक्षाचा प्रभाव मतदारांवर टाकण्यास खलपांना अपयश आल्याचे दिसते.

बार्देश तालुका हा भाजपचा गड मानला जातो. तालुक्यातील एकूण ७ मतदारसंघांपैकी हळदोणा हा मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात असलेले मतदारसंघ आहेत. भाजपच्या ताब्यात असलेल्या सहा मतदारसंघांपैकी म्हापसा, पर्वरी, साळगाव तसेच शिवोली या चार मतदारसंघांवर पक्ष आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकतो. मात्र कळंगुट, हळदोणा तसेच थिवी या मतदारसंघांतून अटीतटीची झालेली लढत पाहायला मिळू शकते. हळदोणा आणि कळंगुट मतदारसंघांतून भाजप तसेच काँग्रेस उमेदवारांत अटीतटीची लढत पाहायला मिळेल. तर थिवी या मतदारसंघातून काँग्रेस, भाजप तसेच आरजी यांच्यात तिहेरी लढत अनुभवायला मिळू शकते.

मतदानाची टक्केवारी वाढावी आणि त्यातून त्याचा लाभ भाजपला व्हावा, यासाठी भाजपचे आमदार, नेते तसेच कार्यकर्ते कार्य करताना दिसत होते. त्याचा लाभ भाजपला होण्याची शक्यता आहे. मात्र तालुक्यातील बऱ्याच मतदान केंद्रांवर काँग्रेसचे कार्य दिसून आले नाही. काही ठिकाणी त्यांची संघटना अस्तित्वात नसल्याने परिणाम होण्याची शक्यता आहे.

मतदारांत काहीशी अनुत्सुकता

यावेळी बार्देशातून झालेल्या मतदानाची सरासरी पाहता, मागील निवडणुकीप्रमाणेच मतदान यावेळीही झाले आहे. मात्र, मागील निवडणुकीच्या तुलनेत झालेल्या मतदानात अल्पसंख्याकांचे मतदान तुलनेत कमी झाले आहे. त्याचा लाभ भाजपला होऊ शकतो. तसेच थोड्याफार प्रमाणात सायलंट मतदान झाले असले तरी हे सायलंट मतदान कोणाच्या बाजूने होईल, याचा अंदाज लागणे अशक्य आहे. मात्र त्याचे फारसे परिणाम होणार नाहीत. मतदारांत काहीशी अनुत्सुकताही यावेळी दिसून आली.
 

Web Title: lok sabha election 2024 result shripad naik likely to dominate bardesh again lack of organizational work in congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.