लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात महिला उमेदवार देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याने बाबू कवळेकर, अॅड. नरेंद्र सावईकर व दामू नाईक यांच्या कार्यकत्यांना धक्का बसला आहे.
कवळेकर यांनी फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर लगेच लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली होती दक्षिण गोव्यातील प्रमुख समारंभांमध्ये तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्येही ते भाग घेत असत. कार्यकर्ते, आमदार, मंत्र्यांना भेटून आपण लोकसभेसाठी इच्छुक असल्याची कल्पना त्यांनी दिली होती.
अॅड. नरेंद्र सावईकर हे माजी खासदार असल्याने त्यांनी मतदारसंघातील लोकसंपर्क कायम ठेवला होता. एनआरआय आयुक्त म्हणूनही त्यांनी लोकसंपर्क वाढवला होता. दक्षिण गोव्यात मोठ्या संख्येने असलेले आखातात काम करणाऱ्या खलाशांच्या अडचणी, कोविड काळात विदेशात अडकलेल्या गोवेकरांना परत मायभूमीत आणण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे त्यांनी आपली लोकप्रियता वाढवली होती.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा फातोड्र्याचे माजी आमदार दामू नाईक हे पक्ष संघटनेच्या कामानिमित्त संपूर्ण गोव्यात फिरत असतात. दक्षिण गोव्यात गाठीभेटींवर त्यांनी भर दिला होता. भंडारी समाजाच्या समर्थनाच्या जोरावर त्यांनी रिंगणात उडी घेण्याची तयारी केली होती, वरील तिघाही भाजप नेत्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागला. त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्तेही दुखावले आहेत. या धक्कादायक निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली दामू नाईक यांना विचारले असता ते म्हणाले कि, कार्यकर्त्यांना कदाचित वाईट वाटले असेल परंतु, मी पक्षाने ज्या-ज्यावेळी माझ्यावर जी जबाबदारी दिली ती प्रामाणिकपणे पार पाडली आहे. निवडून येणे हा निकष आहे.
पक्षाला जर वाटत असेल की मी जिंकणार तर मला उमेदवारी मिळेल. आजवर पक्षानेच मला मोठे केले. पक्षच काय तो निर्णय घेईल. दरम्यान, अॅड. नरेंद्र सावईकर यांना विचारले असता ते म्हणाले कि, अजून कोणाचीही नावे फेटाळलेली नाहीत त्यामुळे मी भाष्य करु इच्छित नाही.
मी अद्याप आशावादीच : बाबू कवळेकर
बाबू कवळेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, अजून नावे फेटाळलेली नाहीत, त्यामुळे मी पूर्ण आशावादी आहे, हातात आलेली जागा गमावू नये, एवढीच माझी इच्छा आहे. भाजपने ही जागा जिंकावला हवी व त्या दृष्टिकोनातून पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. महिला उमेदवार देण्याच्या निर्णयावर पुनर्विचार होईल. अनेक कार्यकत्यांनी आपल्याला वरील निर्णयाने धक्का बसल्याचे सांगितल्याचे बाबू म्हणाले.