पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर व दक्षिण गोव्यात भाजपच्या उमेदवारांना गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्षांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मित्र पक्षांसोबत गुरुवारी पणजीत पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचा एकही राष्ट्रीय नेता गोव्यात निवडणूक प्रचारासाठी येत नाही व यावरून काँग्रेस पक्ष निवडणुकीबाबत गंभीरच नाही असे दिसून येत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे श्रीपाद नाईक व दक्षिण गोव्यात नरेंद्र सावईकर हे उमेदवार आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, फॉरवर्डचे तिन्ही मंत्री व अपक्ष रोहन खंवटे, गोविंद गावडे आणि प्रसाद गावकर हेही भाजपासाठी काम करत आहेत. गावकर हे अजुनही सरकारसोबत आहेत. भाजपातर्फे प्रचारासाठी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, नितीन गडकरी आले. यावरून भाजपा निवडणुकीबाबत किती गंभीर आहे ते कळून येते. काँग्रेसचे काही स्थानिक आमदारदेखील काँग्रेसच्या उमेदवारांसोबत नाहीत. केंद्रात काँग्रेसची सत्ता 70 वर्षे होती. त्यावेळी देशवासियांना तो पक्ष न्याय देऊ शकला नाही व आता न्याय योजना आणून हा पक्ष कोणता न्याय करणार ते कळून येते. गेली पाच वर्षे मोदी सरकारनेच लोकांना न्याय दिला. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना गोव्याला भरीव निधीही मिळाला नाही. मोदी सरकारनेच निधी दिला. शिवाय गोव्याला दोन मंत्रीपदे दिली.
मंत्री जयेश साळगावकर यावेळी म्हणाले की, उत्तरेत खासदार नाईक यांनी खूप कामे केली आहेत. काहीजण ते कामे करत नाहीत असा अपप्रचार करतात. प्रत्यक्षात मी त्यांच्या कामाचा अहवाल पाहिला. तेव्हा बरीच कामे मला दिसून आली. आपण स्वत: नाईक यांच्यासाठी काम करतोच. आमचा पूर्ण पक्ष भाजपासोबत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी काही मूळ काँग्रेसजनांनी आम्हाला म्हणजे गोवा फॉरवर्डला पाठींबा दिला पण आता जर हे मूळ काँग्रेसमन काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारासाठी काम करत असतील तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाही.
मंत्री खंवटे यांनीही आपण पर्वरीत श्रीपाद नाईक यांच्यासाठी काम करत असल्याचे सांगितले. आपण पर्वरीत पंच सदस्य, सरपंच आदींची बैठक घेतली. प्रमुख कार्यकत्र्याची बैठक घेतली, असे खंवटे म्हणाले. आम्ही मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र आलो होतो व अलिकडेच प्रमोद सावंत यांनाही मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही पाठींबा दिला,असे खंवटे म्हणाले.
खाणी सहा महिन्यांतदरम्यान, खनिज खाणी आम्ही पुढील सहा महिन्यांत सुरू करू, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आपण स्वत: खाण पट्टय़ातील आमदार आहे. आपल्याला खाण अवलंबितांची स्थिती ठाऊक आहे. आम्ही निश्चितच खाणी सुरू करणार आहोत, असे सावंत म्हणाले.