पणजी (गोवा) : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी वादग्रस्त दावा केला की, १९६१ मध्ये पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाल्यानंतर गोव्यावर भारतीय संविधान ‘जबरदस्ती’ने लादण्यात आले.
फर्नांडिस यांनी एका प्रचारसभेत बोलताना आठवण करून दिली की, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की, गोवा स्वतःचे भवितव्य स्वतः ठरवेल’, परंतु तसे झाले नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते आम्ही राहुल गांधींसोबत झालेल्या भेटीदरम्यान हा मुद्दाही त्यांना सांगितला हाेता. वक्तव्यानंतर आपली बाजू मांडताना मंगळवारी फर्नांडिस म्हणाले, आपले विधान राजकीय लाभासाठी बदलून सांगितले जाऊ नये. गोव्याची ओळख नष्ट करणे, बेरोजगारी, महागाई यासारख्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आपण तयार आहोत.
मुख्यमंत्री सावंत संतप्तमुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याविषयी संतप्त प्रतिक्रिया देताना विरियातो यांच्या विधानाचा कडक शब्दात समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा मनापासून विश्वास होता. उलट काँग्रेसने गोवा मुक्तीसाठी चौदा वर्षे उशीर केला. आता त्यांच्या उमेदवाराने भारतीय संविधानाची पायमल्ली करण्याचे धाडस केले आहे. काँग्रेसने हे भारत तोडो राजकारण ताबडतोब थांबवावे.
देशाचे तुकडे करण्याचा काँग्रेसचा डाव : पंतप्रधानगोव्यावर भारतीय राज्यघटना लादण्यात आली असे वक्तव्य काँग्रेस उमेदवार विरिएटो फर्नांडिस यांनी केले होते. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाचे तुकडे करण्याचा काँग्रेसचा हा डाव आहे. छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यात मंगळवारी एका प्रचारसभेत ते म्हणाले की, दलित, आदिवासी, मागासवर्गीय लोक सत्तेत सहभागी झाले आहे हे काँग्रेसला पचनी पडत नाही. दक्षिण भारताला वेगळा देश म्हणून जाहीर करावे अशी मागणी कर्नाटकातील काँग्रेस खासदाराने नुकतीच केली होती. आता गोव्यातील काँग्रेसचा उमेदवार म्हणतो की, भारतीय राज्यघटना गोव्याला लागू होत नाही. या उद्गारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान होत नाही का? असा सवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.