पणजी - गोव्यातील भारतीय जनता पक्षामध्ये थोडी खूशी, थोडा गम अशी स्थिती अजुनही आहे. भाजपाच्या ताब्यात असलेल्या दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एक लोकसभा मतदारसंघ गमवावा लागल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजपाच्या कोअर टीमलाही दु:ख झाले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी पंचवीस वर्षे जो विधानसभा मतदारसंघ स्वत:च्या ताब्यात ठेवला होता, तो मतदारसंघ भाजपाने पर्रीकर यांच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यांतच गमावला ही गोष्ट केवळ गोव्यातच नव्हे तर केंद्रीय स्तरावरही भाजपाच्या जिव्हारी लागली आहे. यामुळे गोवा प्रदेश भाजपामध्ये थोडी खूशी, थोडा गम अशी स्थिती आहे.
चार विधानसभा मतदारसंघांतील निदान तीन मतदारसंघांमध्ये भाजपाला विजय मिळाल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सुटकेचा श्वास सोडला. कारण त्यांच्या सरकारची स्थिरता ही पोटनिवडणुकांच्या निकालावर अवलंबून होती. तीन जागा जिंकल्याने भारतीय जनता पक्षाची आमदार संख्या सतरा झाली व गोव्यात हा पक्ष सर्वात मोठा ठरला. अन्यथा यापूर्वी विरोधी बाकांवरील काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता. मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाचा पोटनिवडणुकांवेळी कस लागला. राजधानी पणजीसह चारही मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रचार काम केले. म्हापसा किंवा शिरोडा मतदारसंघ भाजपा जिंकू शकला यात मुख्यमंत्र्यांचेही मोठे योगदान आहे. समजा तीनपैकी दोन जागा जरी भाजपा हरला असला तरी, प्रमोद सावंत सरकारची स्थिरता धोक्यात आली असती. काँग्रेसने सरकार स्थापनेचा दावा करण्याची तयारी अगोदरच करून ठेवली होती.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाला मोठा विजय मिळाल्याने गोव्यातील भाजपाची लाज राखली गेली. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात 2014 साली हिंदू मतदारांनी मोठय़ा प्रमाणात भाजपाला मते दिली होती. यावेळी तशी मते दिली नाहीत ख्रिस्ती मतदारांनी तर बऱ्याच प्रमाणात भाजपाकडे पाठ फिरवली. ख्रिस्ती मतदार मते देणार नाहीत हे स्पष्टच होते.