पणजी : राजधानी शहरापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या निरंकाल, दाभाळ येथील वानरमाऱ्यांना लोकसभेसाठी मतदान करण्याची संधी प्रथमच प्राप्त झाली आहे. शिरोडा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठीही त्यांना मतदान करता येईल. ही जमात मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिली होती. काही जागरुक नागरिकांनी पुढाकार घेऊन २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मतदानाचा हक्क मिळवून दिला. देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी प्रथमच ही जमात दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून मतदान करणार आहे. निरंकाल येथे सुमारे 100 वानरमारे असून 40 जणांना मतदानाचा हक्क प्राप्त झालेला आहे. यात 20 महिलांचा समावेश आहे. २0१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शंभर टक्के मतदान केले होते. लोकसभेसाठी ते प्रथमच मतदान करणार आहेत. वानरांना मारणारी ही जमात दाट जंगलात वास्तव्य करुन होती. नंतर ती निरंकाल येथे स्थायिक झाली. सामाजिक कार्यकर्ते दिवंगत सतिश सोनक आणि कृषीतज्ञ सतीश तेंडुलकर आदींनी पुढाकार घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे ठरवले. त्यांना रेशन कार्डे मिळवून देण्यात अनेक वर्षे गेली. आधार कार्ड तसेच मतदार कार्डे मिळवून देण्यातही बऱ्याच अडचणी आल्या. वन्य प्राणी संवर्धन कायदा लागू झाल्यानंतर वन्य प्राण्यांच्या हत्त्येवर निर्बंध आले. त्यामुळे या वानरमाऱ्यांचा व्यवसाय बुडाला. लोकसभेसाठी प्रथमच मतदान करणार असलेले गोपाळ वसंत पोवार यांनी आपण मतदान करण्यासाठी अगतिक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आजपर्यंत मतदान म्हणजे काय हे आम्हाला माहीतच नव्हते. मुख्य प्रवाहापासून आम्ही दूर आणि वंचितच होतो. लोकसभा निवडणुकीत अपेक्षा विचारल्या असता एका ६५ वर्षीय ज्येष्ठ वानरमाऱ्याने सांगितले की, स्वच्छतागृहे आणि वीज पुरवठा या त्यांच्या मुख्य मागण्या आहेत. वानरमाऱ्यांच्या मुलांना शाळा प्रवेशासाठीही अनेक अडचणी आल्या. कारण जंगलात जन्म झाल्याने जन्म नोंदणी झालीच नाही आणि जन्मतारखांबाबतही पालक अनभिज्ञ आहेत. मात्र शिक्षण हक्क कायद्याखाली (आरटीई) या मुलांची शैक्षणिक अडचणही दूर करण्यात आली, असे तेंडुलकर यांनी सांगितले.
पहली बार, लोकसभेसाठी मतदान; 'ही' जमात पहिल्यांदाच बजावणार मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 10:29 PM