लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : येत्या लोकसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांची भूमिका काय असेल, याबाबत उत्सुकता आहे. गोवा फॉरवर्ड लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, तसेच 'इंडिया' आघाडीत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णयही आपण अजून घेतलेला नाही, असे सरदेसाई यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, त्यांचा कल काँग्रेसपासून दूर राहण्याकडेच असल्याचा संदेश लोकांपर्यंत जात असल्याने या पार्श्वभूमीवर 'लोकमत'च्या या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, काँग्रेसपासून अंतर ठेवण्याचा प्रश्नच नाही. विरोधकांच्या 'इंडिया' युतीकडून आमच्याकडे अजून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. राजकारणात आजची स्थिती उद्या बदलू शकते.
लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवून प्रादेशिक पक्षांनी दिवे लावले, असे याआधी घडलेले नाही. शिवाय लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकीसाठी तेवढा निधीही छोट्या पक्षांकडे नसतो. काही प्रादेशिक पक्ष याला अपवाद आहेत हा भाग वेगळा; परंतु गोवा फॉरवर्ड काही लोकसभा लढवणार नसल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
मध्यंतरी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आरजीला काँग्रेससोबत घेण्याच्या ज्या हालचाली केल्या त्यावरही सरदेसाई नाराज आहेत. काँग्रेसमध्ये विजयचे दक्षिणेतील तिकिटोच्छुक विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन किंवा एल्विस गोम्स, तसेच गिरीश चोडणकर यांच्याशीही पटत नाही. दुसरीकडे मडगावला झालेल्या 'अयोध्या अभियान'मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिसला, अभियानच्या तयारीत ते आघाडीवर होते. अलीकडे मुख्यमंत्र्यांवर कडक टीका करण्याच्या भानगडीतही ते पडत नाहीत.
भाजपला वाटते की, विजय हे येत्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी भाजपला मदत करतील, तर काँग्रेसला असे वाटते की, भाजपसोबत जाणे विजय यांना परवडणारे नाही. सरदेसाई निवडणुकीच्या अखेरच्या क्षणी काय भूमिका घेतील, हे उत्कंठेचे ठरले आहे.
काँग्रेसपासून दोन हात लांब
पर्रीकरांच्या निधनानंतर प्रमोद सावंत मुख्यमंत्री बनले व जुलै २०१९ मध्ये काँग्रेसच्या दहा आमदारांना फोडून सरदेसाई व फॉरवर्डच्या तत्कालीन अन्य दोन मंत्र्यांना डिच्चू देण्यात आला. सरदेसाई हे नंतर काँग्रेसशी संधान बांधतील, अशी अटकळ होती; परंतु काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना अटकाव केला. फेब्रुवारी २०२२ च्या निवडणुकीत जागा वाटपात फातोड्र्याची केवळ एक जागा गोवा फॉरवर्डला दिली. काँग्रेसने ज्या पद्धतीने कारभार चालवला आहे आणि ज्या प्रकारे त्यांचे आठ आमदार फुटले हे पाहता काँग्रेससोबत इंडिया आघाडीत जाण्यास तेवढे अनुकूल नसल्याचेही त्यांच्या काही विधानांवरून जाणवते.