लोकसभेची तयारी; काँग्रेस प्रदेश समितीचा पंचनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 11:00 AM2023-12-01T11:00:00+5:302023-12-01T11:01:17+5:30

काँग्रेसचे प्रभारी माणिकम टागोर यांनी लावले बैठकांचे सत्र

lok sabha preparations panchnama of goa congress pradesh committee | लोकसभेची तयारी; काँग्रेस प्रदेश समितीचा पंचनामा

लोकसभेची तयारी; काँग्रेस प्रदेश समितीचा पंचनामा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकम टागोर दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर असून काल त्यांनी बैठक घेऊन प्रदेश समितीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामाचा पंचनामा केला. दिलेल्या जबाबदाऱ्या पदाधिकारी योग्यरित्या पार पाडत आहेत की नाहीत, याचा आढावा घेताना येत्या लोकसभा निवडणुकीविषयीही चर्चा केली. पक्ष मजबूत करण्याबरोबरच तळागाळातील मतदारांपर्यंत जा, असे संदेश टागोर यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांना दिला आहे.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना टागोर म्हणाले की, गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागांवर काँग्रेसला विजय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. मी आजच्या बैठकीत प्रदेश समितीवरील पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला. वर्ष होऊन गेले त्यामुळे प्रत्येकाला दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी योग्यरित्या पार पाडल्या आहेत की नाहीत, याबाबत आढावा घेतला. बैठकांचे सत्र आजही चालू राहील.

लोकसभेसाठी उमेदवार कधी जाहीर करणार? असा प्रश्न केला असता टागोर म्हणाले की, आधी निवडणूक तरी जाहीर होऊ दे. उमेदवारांबाबत स्थानिक नेतृत्त्वाकडे चर्चा केली जाईल. आम्ही सर्वेक्षणही करणार आहोत. प्रदेश निवडणूक समिती, छाननी समिती उमेदवारांबाबत चर्चा विनिमय करील व नंतर केंद्रीय निवडणूक समिती निर्णय घेईल. योग्यवेळी आम्ही उमेदवार जाहीर करणार आहोत.

पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचीच सत्ता येईल. एक्झिट पोल काँग्रेसला चांगले भवितव्य असल्याचे दाखवत आहे. लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकारला लोकांनी घरी पाठवले की गोव्यातही सावंत सरकार कोसळेल. कारण या सरकारने आमदार विकत घेतले आहेत.

गोव्यात विरोधी समविचारी पक्ष लोकसभेसाठी युती करणार का? या प्रश्नावर टागोर म्हणाले की, केंद्रात 'इंडिया' युतीच्या तीन बैठका झालेल्या आहेत. तिथे सर्व काही निश्चित झाल्यानंतर राज्यांमध्येही विरोधी युतीबाबत निर्णय होईल. गोव्यातही समविचारी पक्षांची युती व्हावी, असे काँग्रेसचीही भूमिका आहे.

भाजप चालतो संघाच्या इशाऱ्यावर

पक्षात स्थानिक पातळीवर अंतर्गत मतभेद असल्यचा जो बोलबाला आहे त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, लोकशाहीत मतभिन्नता असू शकते. आमचा पक्ष लोकशाही तत्त्वे मानणारा आहे. भाजपासारखा नागपूरहून संघाच्या येणाऱ्या आदेशावर चालणारा नव्हे.

यांना हवीय उमेदवारी

प्राप्त माहितीनुसार, लोकसभेसाठी काँग्रेसच्या तिकिटासाठी उत्तर गोव्यात माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप, विजय भिके आदी इच्छुक आहेत. दक्षिण गोव्यात विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, गिरीश चोडणकर व एल्विस गोम्स हे इच्छुक आहेत. विद्यमान खासदार असल्याने तिकीट आपल्यालाच मिळेल याबाबत सार्दिन यांना पूर्ण खात्री आहे.


 

Web Title: lok sabha preparations panchnama of goa congress pradesh committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.