लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्याच्या विकासाठी सरकारच्या मदतीने सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. एआय उद्योगात आपले वेगळे स्थान निर्माण करण्याची क्षमता गोव्यात असल्याचे मत 'लोकमत गोवन ऑफ द इयर अॅवॉर्डस् २०२४' सोहळ्या निमित आयोजित गोवा व्हिजन २०५० या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.
या चर्चासत्रात उद्योगपती तथा गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, शेखर सरदेसाई, शांतनू शेवडे, शांताकुमार यांनी भाग घेतला. मॉडरेटर म्हणून नितीन कुंकळ्येकर यांनी भूमिका बजावली. धेम्पो म्हणाले, विकसित भारत हा उपक्रम पुढे नेताना, गोव्याचीही शाश्वत विकास करण्याच्या दिशेने झेप घेण्याची क्षमता आहे. गोव्यात सामाजिक विकास, पायाभूत सुविधांचा मोठा विकास झाला आहे. गोव्याच्या विकासाच्या दृष्टीने कौशल्य विकास हा महत्वाचा पाया आहे. स्टार्टअप, इनोव्हेन हब म्हणूनही गोव्याकडे पाहिले जात आहे. गोवा हे राज्य लहान असले तरी त्याकडे ब्रँड म्हणून आकर्षित करण्याची क्षमता आहे. यासाठी सर्वानी सरकार तसेच खासगी क्षेत्राच्या मदतीने एकत्र काम करण्याची गरज आहे. मात्र, तसे करताना केवळ त्यांच्यावरही अवलंबून राहू नये, असेही ते म्हणाले.
सरदेसाई म्हणाले, की गोव्याचा सिंगापूर व्हावा. गोव्यात उद्योगांना आकर्षित करण्यासाठी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत अनेक उद्योगांना गोव्यात मान्यता दिली जात आहे. यामुळे केवळ महसूलरुपीच नव्हे तर रोजगाराच्या दृष्टीनेही फायदा होत आहे. रोजगार निर्मिती होत आहे. यामुळे राज्याच्या एकूणच जीडीपीत वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेवडे म्हणाले, गोव्याची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. राज्याला उच्च संस्कृती व लोककलेचा वारसा आहे. गोव्यात उद्योग क्षेत्राचा विस्तार होत आहे. मात्र, गोव्यात एआय उद्योगात आपले वेगळे स्थान निर्माण करण्याची क्षमता आहे. एआयला प्रोत्साहन मिळायला हवे, असे करताना शाश्वत विकासावरही भर असावा, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.