लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : लोकमततर्फे येत्या २८ रोजी गोवन ऑफ द इयर-२०२४ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यावेळी विविध नऊ क्षेत्रांतील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. यासाठी स्थापन झालेल्या ज्युरी समितीची मंगळवारी लोकमतच्या पणजी कार्यालयात बैठक झाली. नामांकने व पुरस्कारांविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.
माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्या अध्यक्षतेखाली ज्युरी समिती कार्यरत आहे. या समितीत राज्य माहिती आयुक्त संजय ढवळीकर, पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, डॉ. पांडुरंग फळदेसाई, उद्योजक संजय शेट्ये, लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते व निवासी संपादक सदगुरू पाटील यांचा समावेश आहे.
विधिमंडळ, क्रीडा, कला, पर्यावरण, आरोग्य, कृषी, नागरी सेवा, पोलिस सेवा आदी क्षेत्रांमध्ये ज्यांनी चांगले योगदान दिले आहे, लक्षवेधी कार्य केले आहे त्यांची निवड पुरस्कारासाठी केली जाणार आहे. त्यासाठी विविध व्यक्तींचा समावेश असलेली नामांकने निश्चित केली गेली.
बैठकीत नामांकनांविषयी चर्चा झाली. पुढील प्रक्रिया यापुढे होईल. येत्या २८ रोजी मिरामार येथील मेरियट हॉटेलमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता सोहळा होईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित असतील. या कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, खासदार फ्रान्सिस सार्दिन व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे खास अतिथी या नात्याने व्यासपीठावर असतील.