पणजी : दै. ‘लोकमत’च्या नि:पक्ष व निर्भिड पत्रकारितेचा गोवा विधानसभेत गौरव करण्यात आला. गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांना प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे विधानसभेत अभिनंदन करण्यात आले.कला, संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. सासवड-पुणे येथे अत्रे प्रतिष्ठानतर्फे त्यांना नुकताच हा पुरस्कार देण्यात आला. पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.ठरावावर बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले, ‘राजू नायक हे तत्त्वश: नेहमी माझ्या विरुद्ध भूमिका घेणारे; पण त्यांनी कधीच दोघांमध्ये शत्रुत्व येऊ दिले नाही. विरोधक असूनही एखाद्या माणसाबरोबर चांगले संबंध कसे ठेवावेत हे त्यांच्याकडून शिकावे. काही चुकीच्या गोष्टी छापून आल्या तर ज्या काही निवडक संपादकांना मी फोन करून सत्य सांगतो, त्यातील एक राजू नायक आहेत. ते ऐकूनही घेतात आणि नंतर वस्तुस्थितीही मांडतात.’विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले, ‘राजू नायक यांची निर्भीड पत्रकारिता आदर्शवत आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने या क्षेत्रात येऊ पाहणाºया नव्या पिढीचे मनोबल वाढेल.’आमदार दिगंबर कामत म्हणाले, ‘१९९४ साली मडगाव मतदारसंघात राजू माझ्याविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरले; पण आमची मैत्री कायम राहिली. ‘सुनापरान्त’चे संपादक असतानापासून आजतागायत ते लिखाणातून परखडपणे विचार मांडतात. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर अनेकदा प्रखरपणे टीका केली; परंतु संबंधांमध्ये कधीच कटुता येऊ दिली नाही.’कला, संस्कृतीमंत्री गोविंद गावडे म्हणाले, ‘राजू नायक यांनी नेहमीच लोकांची बाजू लेखनातून लढविली. सामाजिक, राजकीय, पर्यावरण या विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने युवा पत्रकारांचे मनोबल वाढणार आहे.’
‘लोकमत’शिवाय चैन पडत नाही : पर्यटनमंत्रीपर्यटनमंत्री बाबू आजगावकर म्हणाले, ‘राजू नायक संपादक असलेले ‘लोकमत’ वर्तमानपत्र सकाळी वाचल्याशिवाय चैन पडत नाही. खासकरून कुजबुज हा स्तंभ वाचनीय असतो. राजू व मी तळागाळातून वर आलो. दोघेही मित्र आहोत. त्यांनी प्रत्येक विषय कोणाचीही पर्वा न करता धाडसाने हाताळला. मडगावमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनासाठी मी लढा दिला तेव्हा संपूर्ण शहर माझ्या विरोधात गेले. राजू नायक यांनीही विरोधात लिहिले; परंतु आमच्या संबंधांमध्ये कधी कटुता येऊ दिली नाही.’