- नारायण गावस
पणजी: पणजी राजधानीतील कलाअकादमीच्या दर्यासंगमावर आयोजित केलेल्या लोकोत्सवातील एका स्टॉलधारकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
या स्टॉलधारकाचे नाव मोहम्मद फिरोज (५०) उज्जैन-मध्यप्रदेश येथील असून आज बुधवारी पहाटे त्यांना ह्रदयविकाराच्या तीव्र झटका येऊन मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात ठेवण्यात आला असून सर्व वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहेत.
आज सायंकाळी विमानाने त्यांचा मृतदेह मध्य प्रदेशला नेण्यात येणार आहे. लोकोस्तवात देशभरातील विविध विक्रेत्यांनी आपली दालने मांडली आहेत मोहम्मद फिरोज यांनीही यंदाच्या लोकोत्सवात आपला स्टॉल घातला होता. त्यांचे कुटुंबियही त्यांच्यासोबत होते. तसेच त्यांचे शेजारीही स्टॉल घालून त्यांच्या सोबत होते.
या विषयी अधिक माहिती देताना कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले, घडलेली घटना खरी असून सकाळी त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला. याविषयी पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मोहम्मद फिरोज यांचा मृतदेह गोमेकॉत ठेवण्यात आला आहे. आज सायंकाळी त्यांचा मृतदेह विमानाने मध्य प्रदेशला पाठवण्याची सोयही करण्यात आली आहे.