पणजी : शहरात दरवर्षी होणारा लोकोत्सव महापालिकेने परवानगी नाकारल्याने यंदा अडचणीत आला आहे. मनपाने ताठर भूमिका घेताना आयोजक कला व संस्कृती खात्याने अग्निशामक दल, वाहतूक विभागाची आधी परवानगी आणावी, पार्किंग व्यवस्था, प्रसाधनगृहे, कचरा व्यवस्थापन याचा आराखडा सादर करावा, अशा अटी घातल्या आहेत. येत्या शुक्रवार १0 पासून दर्यासंगमावर लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महापौर उदय मडकईकर म्हणाले की, ‘महापालिकेने परवानगी नाकारण्यामागे काही कारणे आहेत ती अशी की, यावेळी स्टॉल्सची संख्या ५00 वरुन वाढवून ७५0 करण्यात आली आहे. या स्टॉल्सधारकांसाठी केवळ १५ प्रसाधनगृहे दाखवलेली आहेत. परराज्यातील कारागिरांना २00 स्टॉल्स दिले जाणार आहेत. प्रत्येक स्टॉलवर किमान दोन माणसे धरली तरी ४00 लोक झाले. नैसर्गिक विधीसाठी त्यांना १५ प्रसाधनगृहे अपुरी पडतील. आयोजकांनी वाहनांची पार्किंग व्यवस्थाही नीट केलेली नाही. लोकोत्सवाच्यावेळी वाहतूक कोंडी होत असल्याने कांपालवासीयांच्या आधीच वाढत्या तक्रारी आहेत.’लोकोत्सवात दाटवाटीने स्टॉल्स लावले जातात त्यामुळे आगीचाही धोका असतो. अग्निशामक दलाकडून परवानगी आवश्यक आहे, असे मडकईकर म्हणाले.
दरम्यान, लोकोत्सवाच्या काळात वाहतूक तसेच पार्किंगच्या विषयावर पोलिस तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापौर म्हणाले की, ‘खरे तर दर्यासंगमऐवजी यंदा लोकोत्सव कांपाल येथे परेड मैदानावर भरविला जावा, असे आमचे म्हणणे होते परंतु २६ जानेवारीच्या संचलनानिमित्त आधी काही दिवस परेड मैदानाची गरज पोलिसांना भासते त्यामुळे हे शक्य झाले नाही.