पणजी : पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांना दीर्घकालीन व्याजमुक्त कर्ज देण्याची केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेचे गोव्यात स्वागत केले जात आहे. गोव्यात पर्यटन व्यावसायिकांचे प्रतिनिधित्त्व करणाय्रा टूर ॲण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ॲाफ गोवा (टीटीएजी) संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा म्हणाले की,‘ गोवा सरकार केंद्राच्या दीर्घकालीन व्याजमुक्त कर्ज योजनेचा लाभ घेऊन राज्यात जे पर्यटन प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत ते पूर्ण करील.’
गोवा चेंबर ॲाफ कॉमर्सचे अध्यक्ष तथा धेंपो उद्योग समुहाचे चेअरमन श्रीनिवास धेंपो यांनी अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे गोव्यातील पर्यटन क्षेत्राला मोठी संधी प्राप्त झाली असल्याचे नमूद करुन अर्थसंकल्पाचे स्वागत केले. केंद्रीय योजनांचा लाभ आम्ही घेऊ शकतो, असे ते म्हणाले. धेंपो यांनी नुकत्याच झालेल्या ‘इन्वेस्ट गोवा २०२४ ’ परिषदेत आपला उद्योग समूह लवकरच वार्का येथे २०० खोल्यांचे रिसॉर्ट बांधणार असल्याचे जाहीर केले होते.
अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन् यांनी राज्यांना पर्यटन केंद्रे विकसित करण्यासाठी तसेच या पर्यटनस्थळांचे ब्रॅण्डिंग व मार्केटिंग करण्यासाठी दीर्घकालीन व्याजमुक्त कर्ज योजना जाहीर केली आहे. लक्षद्वीपसह अन्य बेटांवर पर्यटन पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे जाहीर केले आहे.