लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : खोर्ली येथे रस्त्याने जाणाऱ्या कचरा वाहू गाडीच्या चाकाखाली सापडून दोन वर्षाचे चिमुरडे गंभीर जखमी झाले आहे. आईच्या हातून सुटून हे मूल रस्त्यावर धावत गेले आणि थेट वाहनाच्या चाकाखाली आले.
खोर्ली येथे ही थरकाप उडवणारी घटना घडली. दोन वर्ष वयाचा मुलगा आपल्या आईबरोबर दुकानात आला होता. आई दुकानात सामान खरेदी करण्यात व्यस्त असताना आईची नजर चुकवून मुलगा रस्त्यावर धावला. त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या कचरावाहू गाडीखाली तो सापडला. वाहनचालकाने गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत मुलगा चाकाखाली सापडला होता.
तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनकच होती. या अपघात प्रकरणी कचरावाहू गाडीचे चालक मल्लिकार्जून मिरागी याला जुने गोवे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
धारगळ येथे भरधाव वाहनाच्या धडकेत एक ठार
सुकेकुळण-धारगळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत ५० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. संजय सुरेश दळवी (रा. सिंधुदुर्ग) असे त्यांचे नाव आहे. काल, दुपारी सव्वातीनच्या सुमारास अपघाताची घटना घडली. सविस्तर वृत्त असे की, संजय दळवी एका पेट्रोलपंपावर कामाला होते. ड्युटी संपल्यानंतर ते आपल्या दुचाकीने (एमएच ०७, ७१६१) म्हापशाहून पेडणेमार्गे सिंधुदुर्गला जात असताना सुकेकुळण-धारगळ येथे एका अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. या धडकेत संजय हे दुचाकीसह रस्त्यावर आदळले. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
त्याचवेळी आ. प्रवीण आर्लेकर हे या मार्गावरून जात असताना त्यांना अपघाताची घटना दिसली. त्यांनी वाहन थांबवून घटनेबाबत विचारपूस केली. मात्र, अपघात कोणीच पाहिला नसल्याचे समोर आले. आर्लेकरांनी तातडीने रुग्णवाहिका व पोलिसांना पाचारण केले. यावेळी मोपाचे सरपंच सुबोध महालेही उपस्थित होते. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.