लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : येथील नगरपालिकेसाठी नवे नगराध्यक्ष निवडीची तारीख जवळ येताच, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यासाठी बुधवारी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची लॉटरी खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या चिठ्ठीतून रवी नाईक यांच्या गटातील आनंद नाईक यांना उमेदवारी निश्चित झाली आहे.
वीरेंद्र ढवळीकर व आनंद नाईक यांच्यापैकी कोणीच मागे हटायला तयार नसल्याने अखेर दोघांच्या नावांच्या चिठ्ठया काढण्यात आल्या. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चिट्ठी काढली व आनंद नाईक यांना उमेदवारीची लॉटरी लागली. आता रायझिंग फोंडाचे केतन भाटीकर आता नेमकी कोणती भूमिका घेतात यावर नगराध्यक्ष निवड बिनविरोध की निवडणूक होणार, हे शुक्रवारी स्पष्ट होईल.
अलिखित करारानुसार नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त आहे. स्थानिक भाजपच्या गटातून मिळालेल्या माहितीनुसार, रितेश यांच्यानंतर वीरेंद्र ढवळीकर यांचे नाव नगराध्यक्ष म्हणून चर्चेत होते. ते बिनविरोध निवडून येतील, असे वाटत असताना अचानक रवी नाईक यांच्या गटातून आनंद नाईक यांचे नाव पुढे आले.
पालिकेत सध्या मूळ भाजपचे असे चार नगरसेवक आहेत तर रवी नाईक यांच्या गटातील सहा नगरसेवक आहेत. नाईक भाजपात असल्याने दहा नगरसेवक भाजपचेच आहेत. तरीही प्रत्येकाची राजकीय महत्त्वाकांक्षा वेगवेगळी आहे. केतन भाटीकर यांच्या रायझिंग फोंडा गटाकडे पाच नगरसेवक असले तरी त्यांच्या गटातील एका नगरसेवकाची सध्याची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे. नगरसेवक शिवानंद सावंत हल्ली भाटीकर यांच्याबरोबर कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दल साशंकता आहे. वीरेंद्र ढवळीकर यांना उमेदवारी न मिळाल्याने मूळ भाजपमधील काहीजण नाराज असतील. कारण रितेश यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपमध्येच दुफळी माजली होती.
दरम्यान, नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार की नाही हे शेवटच्या क्षणी स्पष्ट करू अशी भूमिका केतन भाटीकर यांनी घेतली आहे. याचाच अर्थ गुरुवारी अर्ज भरताना त्यांच्या गटातून एखादा अर्ज आला तर निवडणूक होईल. निवडणूक झाल्यास शिवानंद सावंत नेमके कोणत्या गटात आहेत, हे सुद्धा स्पष्ट होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ भाजपचा गट वीरेंद्र ढवळीकर यांच्या नावावर ठाम होते, परंतु कृषीमंत्री रवी नाईक यांनी मात्र शेवटपर्यंत आनंद नाईक यांच्याच नावाचा आग्रह धरला. सध्या उपनगराध्यक्षपद मूळ भाजपकडे आहे. तूर्तास दीपा कोलवेकर यांचे हे पद हे शाबूत राहील अशी शक्यता आहे. शुक्रवारी जर निवडणूक झालीच तर प्रत्येक नगरसेवकाला महत्त्व प्राप्त होईल. अशावेळी भाटीकर यांच्याकडे असलेल्या नगरसेवकांचे महत्त्व वाढेल.
...तर निवडणूक होईल चुरशींची
भाटीकर हे जरी मगोचे असले तरी नगरपालिकेत ते स्वतंत्रपणे राजकारण करत आहेत. रवी नाईक व त्यांच्या गटातील नगरसेवकांशी त्यांचे खास पटत नसल्याच्याही चर्चा आहेत. अशा परिस्थितीत आनंद नाईक यांचे नाव निश्चित झाले. त्यामुळे मगो सोडून भाजपमध्ये आलेल्या वीरेंद्र ढवळीकर यांना कदाचित पश्चाताप होत असेल. केतन भाटीकर यांनी जर त्यांचे उद्या वीरेंद्र यांची समजूत काढली व त्यांनाच उमेदवारी दिली तर एक राजकीय भूकंप होईल हे निश्चित. वीरेंद्र ढवळीकर यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज भरला, तर निकाल कोणाच्याही बाजूने लागू शकतो. नगरपालिकेत यापूर्वी अशी प्रकरणे घडलेली आहेत.