किशोर कुबल, पणजी: तृणमूल कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून लवकरच ते तृणमूल कॉंग्रेसलाही सोडचिठ्ठी देणार आहेत. या प्रतिनिधीने लुइझिन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, खासदारकीचे राजीनामापत्र मी तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनाही पाठवले असून लवकरच हा पक्षही मी लवकरच सोडणार आहे.
लुइझिन यांना तृणूमलने प्रथम राष्ट्रीय कार्यकारिणीवरुन दूर केले. त्यानंतर नव्याने गठीत केलेल्या राज्य कार्यकारिणीतही त्यांना स्थान दिले नाही. त्यांना खासदारकीही सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलने फातोर्डा मतदारसंघाची दिलेली तिकीट लुइझिन यानी नाकारली तेव्हापासून ममताजींशी त्यांचे बिनसले होते. विधानसभेत तृणमूलच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला त्यामुळेही ममताजी त्यांच्यावर नाराज होत्या.
लुइझिन यांना ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर पाठवले होते. २७ सप्टेंबर २०२१ रोजी लुइझिन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा राजीनामा देऊन तृणमूलप्रवेश केला होता. विखुरलेल्या काँग्रेसजनांना एकत्र आणण्याचे माझे स्वप्न आहे. काँग्रेसची तत्त्वें, ध्येय धोरणे माझ्या हृदयात आहेत. मी मनाने कॉँग्रेस सोडलेली नाही. ममतांची तृणमूल काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, आंध्रातील वायएसआर यांची काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस या सर्वांना मला केंद्र स्तरावरही एकत्र आणायचे आहे, असे त्यावेळी इंदिरा कॉंंग्रेस सोडताना लुइझिन म्हणाले होते.