पणजी: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो इशान्येच्या दिशेने सरकत आहे. या पट्ट्याची तीव्रता कमी असल्यामुळे त्याचे चक्रिवादळात रुपांतर होण्याची शक्यता कमीच आहे. मान्सूनच्या सुरूवातीला आणि मान्सुनच्या शेवटी भारतीय महासागरात चक्रीवादाळाचे धोके असतात. त्यातही सर्वाधिक चक्रीवादळे ही बंगालच्या उपसागरात तयार होतात आणि देशाच्या पश्चीम किना-याला आढळतात. यंदाही असाच प्रकार घडला असून कोलकाता हवामान केंद्राच्या डॉप्लर रडारने ९ आॅक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा टीपला आहे. शांतिनेकेतनच्या आग्नेयेला कोलकातापासून ५० किमी अंतरावर हा पट्टआढळून आल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. पश्चिम बंगाल, ओरिसा, सिक्कीम, छत्तीसगड झारखंड बिहार या राज्यात या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान गोव्यात त्याचा काहीच परिणाम होणार नसल्याचे हवामान खात्याच्या पणजी केंद्राचे संचालक डॉ एम एल साहू यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र सरकारलाही हवामान खात्याकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता तशी कमीच आहे आणि पुढील दोन दिवसात ती आणकी कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. डॉप्लरद्वारे मिळविलेल्या माहितीनुसार हा पट्टा ताशी ८ किलोमीटर इतक्या गतीने सरकत आहे. त्यामुळे त्याचे चक्रिवादळात रुपांतर होण्याची शक्यता कमीच आहे. मंगळवारी पावसाचाही इशारा हवामान खात्याने दिलेला नाही.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, गोवा - महाराष्ट्रात परिणाम नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 9:33 PM