पणजी - गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करुन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याकडे ईशान्य भारतातील आसाम वगळता सात राज्यांच्या प्रभारीपदाची पुन: जबाबदारी सोपविली आहे. फालेरो यांनी २00७-0८ पासून सात वर्षे याआधीही ईशान्येतील या सात राज्यांमध्ये प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते गोव्यात काँग्रेसचे नावेली मतदारसंघाचे आमदारही आहेत.
फालेरो यांनी पुन: त्यांच्याकडे आलेल्या या जबादारीचे स्वागत केले आहे. गेल्यावेळी ते ईशान्येतील सात राज्यांचे प्रभारी होते तेव्हा त्यांच्याकडे अखिल भारतील काँग्रेस समितीचे ३ सचिव संलग्न होते. यावेळी त्यांच्या दिमतीला ७ सचिव मिळणार आहेत. अरुणाचलप्रदेश, मेघालय, सिक्कीम, मिझोरम, मणिपूर, नागालँड आणि त्रिपुरा या सात राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मिझोरममध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असून तेथे काँग्रेसच्या विजयाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
‘गोव्याविषयी नेहमीच प्रेम’
फालेरो म्हणाले की, ‘मला गोव्याविषयी नेहमीच प्रेम आहे. ईशान्येतील जबाबदारी माझ्यावर श्रेष्ठींनी मोठ्या विश्वासाने सोपविली आहे. याआधी प्रभारी असताना अरुणाचप्रदेश, मेघालय आणि मिझोरममध्ये दोनवेळा काँग्रेसला सत्ता मिळवून दिली. ही राज्ये मला नवीन नाहीत. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी पार पाडताना या सातही राज्यांमध्ये काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर देईन. तूर्त मिझोरममधील आगामी विधानसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी आहे. मिझोरम विधानसभेचा कालावधी येत्या १५ डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे त्याआधी निवडणूक होईल.’
दरम्यान, मिझोरम विधानसभेत सध्या ४0 पैकी ३४ जागा कॉँग्रेसकडे आहेत. परंतु देशभरात भाजपची लाट असल्याने मिझोरममध्ये आगामी निवडणुकीत काँग्रेसला कष्ट घ्यावे लागतील.
फालेरो यांनी २६ नोव्हेंबर १९९८ ते ८ फेब्रुवारी १९९९ तसेच ९ जून १९९९ ते २४ नोव्हेंबर १९९९ असे दोनवेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. गोव्यात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपदाची धुराही त्यानी सांभाळली आहे.