लोकमत न्यूज नेटवर्क, हरमलः येथील केरी किनाऱ्यावर सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेले चौघेजण बुडाल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सायंकाळी घडला. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले. सकिना खातून (१८) आणि मोहम्मद बाकीर अली (२४) यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, त्यांच्यासोबत असलेला १६ वर्षीय मुलगा आणि १२ वर्षीय मुलगी बेपत्ता आहेत. त्यांचाही बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. श्री आजोबा मंदिराच्या मागील खडकाळ भागात हा प्रकार घडला. जोरदार लाटेने हे चौघेजण वाहून गेल्याचे समजते.
याबाबत पोलिस आणि घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वीच रमजान ईद साजरी केल्यानंतर २३ जणांचा गट रविवारी केरी किनाऱ्यावर फिरण्यासाठी आला होता. यापैकी चौघे सेल्फी घेण्यासाठी आजोबा मंदिराच्या मागील खडकाळ बाजूला पाण्यात उतरले. हे सर्वजण सेल्फी घेण्यात गुंतले होते तर त्यांच्यासोबतचे इतर मित्र-नातेवाईक किनाऱ्यावर मौजमजा करीत होते. यादरम्यान अचानक मोठी लाट उसळली आणि चौघेही पाण्यात ओढले गेले. त्यांच्यापैकी कोणालाही पोहता येत नसल्याने ते लाटेसोबत वाहून जाऊ लागले. त्यांच्यासमवेत असलेल्यांपैकी एकाने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, त्याचे प्रयत्न अपुरे पडले. त्यामुळे त्याने लगेच किनारा गाठला असे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पेडणेचे पोलिस निरीक्षक देउलकर, दत्ताराम रावत, मोपा पोलीस निरीक्षक निनाद देविळकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांसह 'दृष्टी'च्या जीवरक्षकांनी चौघांचाही शोध सुरू केला. यादरम्यान दोघांचे मृतदेह हाती लागले. तर आणखी दोघे बेपत्ता असल्याचे दिसले. काळोखामुळे अडथळा येवू लागल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.
तरुणावर उपचार
या बुडणाऱ्या चौघांना वाचविण्यासाठी गेलेला आसिफ हा आणखी एक तरुण जखमी झाला, त्याच्यावर गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुडालेले चौघेही कांदोळी आणि म्हापसा येथील होते.
अती धोकादायक परिसरात घटना
ज्या ठिकाणी ही घटना घडली, हा भाग अत्यंत धोकादायक म्हटला जातो. खडकाळ व थेट तीव्र उतार असल्याने स्थानिक शक्यतो या बाजूला फिरकत नाहीत. तरीही पर्यटक येथे सेल्फी घेत पाण्यात उतरतात, असे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद तळकर यांनी सांगितले.
'जेट स्की' वापरून शोधकार्य
किनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकाने तत्काळ बचाव कार्य सुरु केले अशी माहिती दृष्टीच्यावतीने देण्यात आली. जीवरक्षकाने इतर सहकाऱ्यांना बोलावत लोकांना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जेट स्कीचा वापर करण्यात आला. दोघांना किनाऱ्यावर आणले. पथकाने त्यांना 'सीपीआर' देण्याचा प्रयत्न केला. आपत्कालीन सेवेला याची माहिती दिली. रुग्णवाहिकेतून त्यांना जवळच्या आरोग्य केंद्राकडे नेण्यात आले, असे दृष्टीने सांगितले.
खडकावर लाट आली....
दरम्यान, 'दृष्टीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, समुद्र किनारी असलेल्या खडकाळ भागावर अचानक आलेल्या लाटेने या चौघांना ओढून नेले. हे सर्वजण केरी बीचवरून हरमल किनाऱ्यावरील गोड्या पाण्याच्या तलावाकडे जात होते. त्यावेळी चौघे सेल्फी घेण्यासाठी खडकाळ भागाकडे मागे सरकले. धोक्याची सूचना देणारे नो सेल्फी झोन चे सावधगिरीचे फलक असूनही ते खडकाळ भागात थांबले आणि अचानक आलेल्या लाटेने त्यांना समुद्रात ओढले.
सूचना फलकांकडे दुर्लक्ष
येथील किनाऱ्यावर तसेच पर्यटनस्थळी पर्यटकांनी सूचना फलकांकडे दुर्लक्ष केले. धोक्याचा इशारा देणारे फलक असूनही त्याकडे काणाडोळा करणे महागात पडले, ही दुर्देवी घटना असल्याचे नवीन कुबल यांनी सांगितले. किनारी भागात धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, पर्यटकांकडून उत्साहाच्या भरात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते, असे स्थानिकांनी सांगितले.
पिकनिकचा बेरंग
हे सर्वजण कांदोळी- म्हापसा येथील एकाच कुटुंबातील असून सर्वजण तेरेखोल, केरी येथे पिकनिकसाठी गेले होते. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण सेल्फी घेण्यासाठी असुरक्षित क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात उतरले होते. त्यावेळी हा दुर्देवी प्रकार घडला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"