पणजी: गोल्डन ग्लोबच्या एम व्ही सेंट डोमिनो कॅसिनोला १६ जानेवारीपर्यंत जेटी देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. प्रदोष यांनी न्यायालयात सांगितले. त्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती त्यांनी न्यायालयाला दिली. गोल्डन ग्लोबच्या एम व्ही सेंट डोमिनो कॅसिनो जहाजाला पणजी जेटी वापरायला देण्याच्या बाबतीत सरकारने ८ दिवसांत काय तो निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने २० डिसेंबर रोजी दिला होता आणि या कॅसिनो जहाजाला जेटी देणार असल्याचे सरकारच्या प्रतिज्ञापत्रकात म्हटले होते.मंगळवारी हे प्रकरण सुनावणीला आले तेव्हा या कॅसिनोला जेटी देण्याची प्रक्रिया विल का होत आहे, असा प्रश्न केला. तेव्हा सर्व प्रक्रिया पूर्ण होत आली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. गोल्डन ग्लोब कंपनीचा लकी ७ कॅसिनो जहाज मिरामार किना-यावर रुतल्यानंतर ते नादुरुस्त बनले होते. ते दुरुस्तीसाठी इतरत्र हलविण्यात आल्यानंतर ते पुन्हा मांडवीत आणण्यासाठी मागितलेली परवानगी सरकारने नाकारली होती.गोल्डन ग्लोबच्या कॅसिनोसाठी परवानगी आहे, परंतु जेटी मंजूर करण्यात आली नव्हती. त्यामुळे मांडवीत नांगरणा-या महाराजा जहाजाचाच उपयोग करून कॅसिनो सुरू करण्यात येणार आहे. त्याला एम व्ही सेंट डोमिनो कॅसिनो असे नावही देण्यात आले आहे. कंपनीने त्यासाठी जेटी मागितली होती. गोल्डन ग्लोब कंपनीकडून थकबाकी आणि परवाना शुल्काच्या रुपाने सरकारने ५० कोटी रुपये वसूल करून घेतले होते. त्यामुळे कंपनीला जेटी वापरायला दिलीच पाहिजे, असा आग्रहही सुनावणीदरम्यान कंपनीकडून धरला होता. १६ जानेवारी पूर्वी या कॅसिनोला जेटी मिळणार असल्यामुळे याच महिन्यात मांडवीत सहावा कॅसिनो सुरू होण्याची पूर्ण शक्यता आहे.
एम. व्ही. डॉमिनो कॅसिनोला 16 जानेवारीपूर्वी जेटी, सरकारचे न्यायालयात निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 9:40 PM