लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : मडगाव जंक्शन ते बांद्रा टर्मिनस विकली एक्स्प्रेस (क्रमांक १०११६/१०११५) या नवीन रेल्वेगाडीचा शुभारंभ पर्यावरण व कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. मडगावचे आमदार दिगंबर कामत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, कोकण रेल्वेचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली रेल्वेसेवांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्याचे मंत्री सिक्वेरा यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर सांगितले. मडगावकरांच्या आणि गोव्याच्या सर्व नागरिकांच्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची बाब आहे. ज्यांना मुंबईला जायचे आहे, त्यांच्यासाठी ही रेल्वे सुरू केली आहे. आतापर्यंत मडगावहून बांद्रा अशी रेल्वे गाडी नव्हती. ही पश्चिम रेल्वेची गाडी असून कोकण रेल्वे महामंडळाकडून देखभाल करण्यात येईल, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.
देशात रेल्वे जाळे भक्कम करण्यावर जास्त भर दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसेच रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने ही रेल्वे सुरू झाल्याने त्यांचे अभिनंदन करतो. वंदे भारत एक्स्प्रेस मडगावहून मुंबई, मडगावहून मेंगळुरू अशी सुरू झाली आहे. अशा पद्धतीने रेल्वेचे जाळे फास्ट गतिशील करण्याचा प्रयत्न आहे. रेल्वेचे सध्या जगातील सर्वांत मोठे नेटवर्क या देशात असून, असे नेटवर्क कुठेच असू शकणार नाही. पण, त्याची नीट देखभाल करणे, वेळोवेळी पाहणी करणी आणि चांगल्या सुविधा देणे हे महत्त्वाचे आहे, असे कामत यांनी सांगितले.
गाडीचे वेळापत्रक
ही ट्रेन मडगावहून मंगळवारी आणि गुरुवारी सुटणार व बुधवारी आणि शुक्रवारी मुंबईहून सुटून मडगावात पोहोचणार आहे. सकाळी ७.४० वा. मडगाव येथून सुटणार असून, त्याच दिवशी बांद्रा स्टेशनवर रात्री १०.४० वा. पोहोचणार आहे. बांद्रा स्टेशनवरून सकाळी ६.५० वा. सुटणार असून, त्याच दिवशी मडगाव स्टेशनवर रात्री १० वा. पोहोचणार आहे. ही ट्रेन थिवी स्टेशनवर थांबा घेणार आहे.