मडगाव - मुख्यमंत्रीप्रमोद सावंत आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांच्यात सध्या वाक्युद्ध चालू असतानाच रवींद्र भवनवर अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केलेले प्रशांत नाईक व साईश पाणंदीकर या दोघांनाही रवींद्र भवनच्या कार्यकारिणीवरुन तडकाफडकी काढून टाकण्याबरोबरच रवींद्र भवनची सर्व समिती बरखास्त करण्याचा आदेश कला व संस्कृती खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी मंगळवारी जारी केला. सध्या मडगावच्या रवींद्र भवनावर प्रशासक म्हणून पिळर्णकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पिळर्णकर यांनी मंगळवारी हा आदेश जारी केला असून ही समिती नेमकी कोणत्या कारणासाठी बरखास्त केली याचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. वास्तविक या समितीचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपायचा होता, असे असताना एक महिना अगोदर हा आदेश का जारी करण्यात आला याबद्दल आश्र्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात रवींद्र भवनचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याकडे संपर्क साधला असता, असा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला असतो. मात्र, मुख्यमंत्रीप्रमोद सावंत आणि कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे या दोघांनीही आपले काम चांगल्याप्रकारे चालले आहे असे म्हटले होते, असे असतानाही केवळ एक महिना बाकी असताना आपली समिती का बरखास्त केली हेच कळणे कठीण झाले आहे. हा आदेश अजुन मी वाचलेला नाही. तो वाचल्यावरच सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त करु असे ते म्हणाले.