मडगाव : यंदाचा पावसाळा सुरु होण्यापूर्वी मडगाव शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. मडगाव शहर हे भूमिगत वीज यंत्रणेने सज्ज झालेले गोव्यातील पहिले शहर होणार आहे. भूमिगत वीज यंत्रणेच्या बाबतीत मडगाव राजधानी पणजीवरही मात करणार आहे.
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शनिवारी सकाळी त्यांच्या हस्ते कोलमरड भागातील भूमिगत वीज यंत्रणोच्या कामाला सुरुवात झाली. यावेळी मुख्य वीज अभियंते एन. एन. रेड्डी, अधिक्षक अभियंते कालरुस फर्नाडिस, सहाय्यक अभियंते संदीप प्रभूदेसाई व दिनेश महाले, तसेच नगरसेवक मनोज मसुरकर, अविनाश शिरोडकर व दामोदर नाईक हे उपस्थित होते. एकूण 24 कोटी रुपये खचरून हे काम हाती घेण्यात आले आहे.
याबाबतीत माहिती देताना कामत म्हणाले, कोलमरड येथील थोडा भाग भूमिगत वीज यंत्रणोला जोडण्याचा राहिला होता. हा भाग जोडण्यासाठी आके सब स्टेशनवरुन केबल टाकण्याचे काम आठ दिवसांपूर्वीच सुरु झाले असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार आहे. हे काम झाल्यानंतर मडगाव शहर शंभर टक्के भूमिगत वीज यंत्रणोला जोडले जाणार आहे.
याशिवाय खारेबांद येथे नवीन फिडर बसवून तो आके वीज केंद्राला जोडण्यात येणार असून लोहिया मैदानाजवळ आणखी एक फिडर उभारुन तो मोती डोंगर वीज केंद्राला जोडला जाणार आहे. ज्याच्यामुळे या भागात वीज गेली तर दुसऱ्या केंद्रातून या दोन्ही भागांना वीज पुरवठा केला जाणार आहे.
यावेळी बोलताना कामत म्हणाले, मी वीज मंत्री असताना मडगावच्या बाबतीत परिपूर्ण वीज यंत्रणा उभारण्याचा संकल्प मी केला होता. मडगाव हे गोव्यातील एकमेव शहर आहे जेथे चार उपवीज केंद्रे आहेत. त्यामुळे मडगावात वीज जाण्याचे फारसे प्रसंग येत नाहीत. कुठल्याही फिडरवरुन वीज गेल्यास त्या भागाला दुसऱ्या फिडरवरुन वीज देता येते. आता खारेबांद येथेही ही व्यवस्था होणार आहे. त्याशिवाय कोलमरड भाग आके केंद्राला जोडल्यामुळे वीजेच्या तक्रारी घेऊन नावेली केंद्रावर लोकांना जावे लागणार नाही.
आके उपवीज केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी या केंद्रावर 10 एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून येत्या सात दिवसात कोकण रेल्वे वीज उपकेंद्रावरही या क्षमतेचा आणखी एक ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. त्याशिवाय भविष्यात मडगाव शहरासाठी आणखी पाच ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येतील. आके व कोंकण रेल्वे केंद्रावरील ट्रान्सफॉर्मरचे लवकरच वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.