लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोवा विधानसभेतील बहुतांश राजकीय पक्षांशी हातमिळवणी करून जमीन माफियांचे गोव्याच्या जमिनीवर चालू असलेल्या अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न प्राधान्यक्रमाने समंजस व विचारी गोमंतकीयांनी हाती घेतला पाहिजे, अन्यथा गोव्याची संस्कृती, परंपरा व निसर्गसंपत्तीचा पूर्णत: -हास होईल व निसर्गसंपन्न गोवा रसातळाला जाईल, अशी भीती साहित्यिकांनी चर्चेत व्यक्त केली.
पत्रकार व लेखक संदेश प्रभुदेसाय यांच्या 'अजीब गोवास गजब पॉलिटिक्स' या पुस्तकाच्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन करताना झालेल्या चर्चेत सर्वच वाचक- वक्त्यांनी एकसुरात ही चिंता व्यक्त केली.
वरिष्ठ पत्रकार डेरेक आल्मेदा, कामगार नेते अॅड. जतीन नाईक, आदिवासी विचारवंत डॉ. मधू घोडकिरेकर, सत्तरीतील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते अँड. शिवाजी देसाई व युवा लेखक व कार्यकर्ती अन्वेषा सिंगबाळ यांनी या चर्चासत्रात विचार मांडले.
अभिनव पद्धतीने वाचकांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित करताना त्यात इतर वाचक सुभाष साळकर, धर्मानंद वेर्णेकर, वामन प्रभू प्रतिभा बापट, पॅट्रिशिया पिंटो, प्रशांत नायक, विजय डिसोझा, कुलदीप कामत व पलाश अग्नी यांनीही भाग घेतला.
दीड तास झाली सखोल चर्चा
सुमारे दीड तास चाललेल्या या चर्चेत गोव्याच्या बदलत्या राजकीय स्थितीमागील मूलभूत कारणांवर सखोल चर्चा झाली. गोव्यातील मूळ निवासी असूनदेखील आदिवासींच्या हातातून गेलेली जमिनीची मालकी, भगवान परशुरामाने गोमंतभूमी निर्माण केली या दंतकथेमागील जमिनीचे राजकारण, आजपर्यंत अव्याहतपणे चालू असलेल्या गोमंतकीय ख्रिश्चनांच्या बाह्य स्थलांतराचा गोव्याच्या राजकीय स्थित्यंतरावर झालेला परिणाम, कामगार, व्यापारी व हॉलिडे होम्सचे निवासी म्हणून गोव्यात चालू असलेल्या बिगरगोमंतकीयांच्या स्थलांतराचा परिणाम, 'पोगो' विधेयकाची संविधानात्मक वैधता, गावकारी विरुद्ध कोमुनिदाद या संकल्पनांच्या जमीन मालकीची अवस्था, तसेच आल्वारा, आफ्रामेंत, मोकाशे अशा जमनींची झालेली अवस्था अशा विविध विषयांवर यावेळी अर्थपूर्ण चर्चा झाली.
....यांनी घेतला चर्चेत सहभाग
यावेळी रिव्होल्युशनरी गोवत्स पार्टीचे नेते मनोज परब, प्रशांत नायक प्रदीप नायक व राजेंद्र घाटे हे राजकीय कार्यकर्ते, हरित कार्यकर्ता पॅट्रिशिया पिंटो, संशोधक युगांक नायक, पत्रकार शैलेंद्र मेहता व किशोर नाईक गावकर, लेखक चेतन आचार्य तसेच योगेश गायतोंडे यांनी वाचक या नात्याने चर्चेत सहभाग घेतला.
गोमंतकीयांनो विघातक परिणामांचा विचार करा
हे पुस्तक वाचून जबाबदार गोमंतकीयाने सध्याच्या राजकीय परिस्थितीचा गोव्याच्या भवितव्यावर होणाया विघातक परिणामांवर विचार करावा, असे आवाहन सर्व वाचक- वक्त्यांनी केले. गोव्याचा इतिहास, लोकसंख्याशास्त्र, अर्थकारण, राजकारण, समाजशास्त्र आणि संस्कृती अशा सर्व दृष्टिकोनातून राजकीय स्थितीचा पुस्तकात संशोधन व आकडेवारीच्या आधारावर सर्वांगीण आढावा घेतल्यामुळे पुस्तकाला परिपूर्णता लाभली, असे वक्त्यांनी नमूद केले.
वक्त्यांचा सन्मान
या चर्चासत्राचे संचालन युवा स्तंभलेखक व सामाजिक कार्यकर्ता अॅड. हृषिकेश कदम यांनी केले तर युवा स्तंभलेखक व सामाजिक कार्यकर्ता कुलदीप कामत यांनी सूत्रसंचालन केले. कु. मांगिरीश पाटील व सामाजिक कार्यकर्ता प्रशांती तळपणकर यांनी वक्त्यांना भेटवस्तू प्रदान केल्या. हे पुस्तक हार्डबाउंड व पेपरबॅक अशा स्वरूपात गोव्याच्या विविध शहरातील पुस्तकालये व प्रमुख वर्तमानपत्र विक्रेत्यांकडे उपलब्ध असून त्याशिवाय अमेझॉन इन वरही ऑनलाइन उपलब्ध आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"