पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आमदार बाबू आजगावकर व दीपक पावसकर यांनी वेगळी चूल मांडत स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यांना राजकीयदृष्टय़ा एकटे पाडण्याच्या हालचाली मगोपकडून खेळल्या जात असतानाच त्यांनी पक्षाला हा दणका दिला आहे. ते आजच दुसरा गट स्थापन केल्याची नोंदणी विधानसभा अध्यक्ष मायकल लोबो यांच्याकडे करणार होते. परंतु ते दुबईला गेले आहेत. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून बाबू आजगावकर यांना पक्षातून बडतर्फ करण्याची योजना घाटत आहे.
आजगावकर व पावसकर हे दोघे एकत्र असल्याने ते पक्षाचे विधिमंडळातील दोन तृतीयांश सदस्य बनतात व पक्षांतर करू शकतात. मगोपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मार्च रोजी केंद्रीय समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. त्यात बडतर्फीचा ठराव संमत होणार असल्याचे वृत्त आहे. समितीच्या एका सदस्याने सांगितले की, विधिमंडळ पक्ष वाचविण्याच्या नावाखाली ही चाल खेळली जाणार आहे.
सोमवारी रात्री प्रमोद सावंत यांच्या नावाला मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न चालला असता मगोपचे नेते सुदिन ढवळीकर नवे अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न करीत होते. तेव्हा बाबू आजगावकरांच्या नेतृत्वाखाली दीपक पाऊसकर यांनी भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन भाजपच्या आघाडी सरकारला संपूर्ण पाठिंबा देऊ केला होता. त्यावेळी ढवळीकरांची भेट होत नव्हती. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी ढवळीकरांना बाहेर ठेवून नव्या मंत्रिमंडळात आजगावकर व पाऊसकर यांना स्थान देण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे आजगावकर-पाऊसकर यांचा गट तोडण्यासाठी धारगळ आमदारावर कारवाई करण्याची योजना तयार करण्यात आली होती.
आजगावकर म्हणाले, आमच्या पक्षाला २०१७मध्ये काँग्रेस पक्षानेही सरकार घडविण्याचे आमंत्रण दिले होते; परंतु ढवळीकरांनी भाजपला पाठिंबा देण्याचे निश्चित केले तेव्हाच आपण या सरकारबरोबर संपूर्ण कारकीर्द कायम राहू असे ढवळीकरांना म्हटले होते. आजही आमचे तेच मत कायम आहे.
मगोपमध्ये ढवळीकर बंधूंनी आजगावकर व पाऊसकर यांच्यापेक्षा आपल्या घराण्याचेच राजकारण पुढे दामटण्याचे राजकारण चालविल्याने हे दोघे असंतुष्ट आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नितीन गडकरी यांच्यापाशीही तशा भावना बोलून दाखविल्या होत्या.
केंद्रीय समितीची आज बैठकमगोपच्या केंद्रीय समितीचे उपाध्यक्ष रत्नकांत म्हादरेळकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, ‘पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक शनिवारी 23 रोजी सकाळी 10.30 वाजता बोलावण्यात आली आहे, ही गोष्ट खरी; परंतु कोणावर कारवाई वगैरे करण्याचा हेतू नाही आणि तसा मुद्दाही विषयपत्रिकेत नाही. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालेले आहे. त्यामुळे सरकारमध्ये मगोपची पुढील वाटचाल कशी असावी, याबाबत तसेच मांद्रे व म्हापसा विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षाच्या भूमिकेबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. केंद्रीय समितीविषयी मत कलुषित करण्यासाठीच कारवाईच्या अफवा उठविल्या जात आहेत.’