लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मित्रपक्ष असूनही भाजप भर लोकसभा निवडणुकीच्या काळात मगोपच्या कार्यकर्त्यांना फोडून पक्षप्रवेश देत असल्याने मगोप नेतृत्वामध्ये नाराजी पसरली आहे.
सावर्डे मतदारसंघाचे गत विधानसभा निवडणुकीतील मगोपचे उमेदवार बालाजी गावस यांना मगोपमधून फोडून काल भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्याने ही नाराजी उफाळून आली आहे. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, मगोपची मते भाजपच्या उमेदवारालाच मिळाली असती. बालाजी यांना फोडून भाजपत प्रवेश देऊन त्या पक्षाने फार काही साध्य केलेले नाही. उलट मित्रपक्षाचे कार्यकर्ते तसेच मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे. निवडणुकीच्या काळात तरी असा संभ्रम निर्माण होणार नाही, याची काळजी भाजपने घ्यायला हवी.
ढवळीकर म्हणाले, भाजपचे दोन्ही उमेदवार आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून आणायला हवेत. मगोपचे सर्व कार्यकर्ते त्यासाठी कार्यरत आहेत. बालाजी यांनीही आपण भाजप उमेदवारासाठी काम करणार, असे आधीच जाहीर केले होते.
भाजप उमेदवारालाच त्यांची मते मिळाली असती, असे असताना बालाजी यांना फोडून भाजप प्रवेश देण्यात आला. त्याने काहीच साध्य झालेले नाही. मित्रपक्षाचे कार्यकर्ते फोडण्याऐवजी भाजपने काँग्रेस, आप किंवा आरजीचे कार्यकर्ते भाजपत आणून मते वाढवली असती तर ते योग्य ठरले असते.
दरम्यान, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हेही भाजपच्या निकट गेलेले आहेत. अनेक कार्यक्रमांमधील त्यांची विधाने भाजपच्या ते किती जवळ गेले आहेत, याची चुणूक देतात. अनेकदा ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेच आपले नेते, असे सांगत असतात.
शब्द फिरवला...
मगोपच्या एका नेत्याने सांगितले की, विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेवेळी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी पुढील पाच वर्षे मगोपचे नेते भाजप फोडणार नाही, अशी ग्वाही दिलेली, असे असतानाही स्थानिक भाजप नेते मगोपच्या कार्यकर्त्यांना गळाला लावत आहेत.