पणजी : मगो पक्षाचे नाव आम्ही बदलणार नाही. मगोपचा सिंह हा सर्व गोमंतकीयांना प्रिय आहे. पक्षाचे नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर व बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंगळवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. मगोपचे नाव बदलण्याचा सल्ला दुस-या पक्षांचे काही नेते देत असल्याविषयी पत्रकारांनी विचारले असता, मंत्री ढवळीकर म्हणाले की नावात काही नाही. काम करून दाखवायला हवे. मगो पक्ष जनमत कौल हरल्यानंतरही लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 53 टक्के गोमंतकीयांनी मगोपला मते दिली व पुन्हा सत्तेवर आणले होते. मगोप हा गोमंतकीयांचा पक्ष आहे. मगोप म्हणजे माङया गोंयकारांचो पक्ष असा उल्लेख मी अनेकदा करत असतो. नावात काही नाही. स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव दयानंद बांदोडकर असे होते पण ते लोकांचे भाऊ बनले होते.मंत्री ढवळीकर म्हणाले, की मगोपचे नाव बदलण्याचे सल्ले अन्य पक्षांनी आम्हाला देऊ नयेत. जे राजकीयदृष्टय़ा विजनवासात गेले आहेत, त्यांचे सल्ले तर नकोच. मराठी व कोंकणी ह्या दोन्ही आमच्या भाषा आहेत असेही धोरण मगोपने स्वीकारलेले आहे. येत्या 10 मार्च रोजी मगोपचा स्थापना दिवस विविध कार्यक्रमांनिशी पक्ष साजरा करणार आहे. प्रथम 10 रोजी फर्मागुडी येथे कार्यक्रम होईल. त्यानंतर दि. 17 मार्चपासून सर्व तालुक्यांमध्ये मगोपच्या स्थापनेचे कार्यक्रम होतील. म्हापशात मोठी सभा होईल. भाऊसाहेब बांदोडकर,मगोप, शशिकला काकोडकर यांचे कार्य याविषयीची माहिती असणारी पुस्तिका प्रकाशित केली जाईल. तसेच एक छोटे फिल्म देखील बांदोडकरांविषयी तयार केले जाईल.
कार्निव्हल संस्कृती नव्हे...पेडण्यात मगोपचे एक मंत्री कार्निव्हल करू पाहत असून त्यास विरोध होत असल्याविषयी पत्रकारांनी विचारताच मंत्री ढवळीकर म्हणाले, की कार्निव्हल ही आमची संस्कृती नव्हे. एकेकाळी स्व. डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी देखील कार्निव्हल ही आमची संस्कृती नव्हेच असे जाहीर केले होते. मगोपचे मंत्री बाबू आजगावकर हे पर्यटन मंत्री आहेत आणि पर्यटन खाते किंवा सरकार जे निर्णय घेत आहे, त्यात मगो पक्ष हस्तक्षेप करणार नाही.