ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 24 - काँग्रेसचे पांडुरंग मडकईर यांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय हा केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांना विश्वासात घेऊनच घेतल्याचा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला आहे तर नाईक हा दावा फेटाळताना आपल्याला या बद्दल एका शब्दानेही सांगण्यात आले नव्हते असे म्हटले आहे. नाईक यांचे पुत्र सिद्धेश नाईक या मतदारसंघातून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून गणले जात होते.
मडकईकर यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपमध्ये माजलेली धुसफूस आता उघड होऊ लागली आहे. भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून या मतदारसंघात सिद्धेश नाईक यांना पाहिले जात होते आणि या मतदारसंघात ते मागील ४ वर्षाहून अधीक काळ सक्रीयही होते. मोठ्या प्रमाणावर तरुण कार्यकर्त्यांची फळीही त्यांनी बनविली होती. त्यामुळे मडकईकर यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचालींना विरोध दर्शविताना त्यांनी भाजपची निशाणी न घेता मोटरसायकल रॅली काढली होती. परंतु हा विरोध असतानाही मडकईकर यांना पक्षात प्रवेश दिल्यामुळे या मुद्यासंबंधीचे पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले आहेत.
या विषयी विचारले असता पर्रीकर यांनी सांगितले की मडकईकर यांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय हा श्रीपाद नाईक यांना विश्वाात घेऊनच घेण्यात आला आहे. प्रवेश समारांभाला त्यांचे पुत्र सिद्धेश का उपस्थित राहिले नाहीत हे तुम्ही सिद्धेशलाच विचारा असेही ते म्हणाले. पक्षात या संबंधी कोणतेही मतभेद नसल्याचा दावा त्यांनी केला. परंतु श्रीपाद नाईक यांना याविषयी विचारले असता त्यांनी पर्रीकर यांचा दावा साफ फेटाळला. मडकईकर यांच्या भाजप प्रवेशासंबंधी आपल्याला काहीही सांगण्यात आले नव्हते. सर्व करून झाल्यानंतर आपल्याला सांगण्यात आले. याला विश्वासात घेतले असे म्हणत नाहीत असे ते म्हणाले.
प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय
पांडुरंग मडकईकर यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे हा इतकी वर्षे प्रामाणिकपणे काम केलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय असल्याचे भाजपचे सिद्धेश नाईक यांनी म्हटले आहे. आपला स्वत: मडकईकर यांना विरोध होता आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध दर्शविण्यासाठी मतदारसंघातून रॅलीही काढली होती असे ते म्हणाले.
‘माझे ऐकून घेतले नाही’
मडकईकर यांना भाजपमध्ये घेताना मला मुळीच विश्वासात घेतले नव्हते. त्यांना जे काही करायचे होते ते करून मला सांगण्यात आले होते. तुम्ही जे करत आहात ते बरोबर नव्हे असे मी सांगितले होते, परंतु माझे काहीच ऐकून घेण्यात आले नाही. करायचे ते करून घेतले आणि आता मला कशाला त्यात धरतात?
- श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष्यमंत्री