पणजी - मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड आमच्यासाठी आश्चर्यच होते. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल याबाबत आम्ही अनभिज्ञ होतो, अशी कबुली शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत यांनी दिली.
सामंत म्हणाले की,‘ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करणे ही महाराष्ट्रातील भाजप विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप श्रेष्ठींची स्ट्रॅटेजी होती. शिवसेना मित्रपक्षांनी कमकुवत केली आणि आमच्याच लोकांनी त्यांना या कामी साथ दिली त्यामुळे आम्ही वैतागलो होतो.’
शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन पहाटे गोव्याच्या ताज कन्वेंशन हॉटेलमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांच्या सहकारी बंडखोर आमदारांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शिंदे हॉटेलात दाखल झाल्यावर आमदारांनी शिंदे झिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, आनंद दिघे झिंदाबादच्या जोरदार घोषणा दिल्या. महिला आमदाराने शिंदे यांची ओवाळणी करुन स्वागत केले. शिंदे यांनी त्यानंतर सकाळी सहकारी आमदारांची बैठक घेऊन त्यांना मुंबईत काय घडले याची माहिती दिली. आता शिंदेंसोबतच बंडखोर आमदार बहुमत चाचणीसाठी मुंबईला जातील. अजून वेळ ठरलेली नाही.