पणजी : गोव्यातील भाजपच्या अनेक नेत्यांनी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी, शेकडो पदाधिकारी व कार्यकत्र्यानी यावेळी प्रथमच महाराष्ट्रात तळ ठोकून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी प्रचार केला होता पण जिथे जिथे गोवा भाजपचे नेते प्रचारासाठी गेले, तिथे भाजपचे उमेदवार काही निवडून आले नाहीत. यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना युती जिंकली तरी, गोवा भाजपच्या उत्साहाला मात्र मर्यादा पडल्याचे संकेत येथील नेत्यांच्या चर्चेतून मिळत आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री मिलिंद नाईक, आरोग्य मंत्री विश्वजित राणो, बांधकाम मंत्री दिपक प्रभू पाऊसकर या सर्वानी महाराष्ट्रात जाऊन भाजपचे प्रचार काम केले. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुर, साताराच्या पट्टय़ात जाऊन युवकांशी संवाद साधण्याचे कार्यक्रम घेतले. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी चार दिवस महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी तळ ठोकला होता. मनोहर र्पीकर मुख्यमंत्रीपदी असताना महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये जेवढे प्रचार कार्य करायचे, त्यापेक्षा जास्त प्रचार काम प्रमोद सावंत यांनी यावेळी केले. उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी पनवेल व अन्य भागांमध्ये जाऊन भाजपचे प्रचार काम केले.
मंत्री पाऊसकर यांनी पेण भागात तर गोव्याचे आरोग्य मंत्री राणे यांनी दोडामार्ग-सावंतवाडीच्या भागात राजन तेली यांच्यासाठी प्रचार केला. भाजपचे संघटन मंत्री सतिश धोंड व इतरांनी कोंकणात तळ ठोकला होता. माजी खासदार खासदार नरेंद्र सावईकर, सरचिटणीस सदानंद श्ेाट तानावडे यांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे प्रचार काम केले. गोव्यातील भाजप नेत्यांनी प्रचार केलेल्या बहुतांश भागात भाजपचा पराभवच झाला.
जर आम्ही प्रचार केलेल्या भागात भाजपचे उमेदवार जिंकेल असते तर आमचा उत्साह वाढला असता, असे गोव्यातील भाजप नेत्यांनी महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर सांगितले. मुख्यमंत्री सावंत यांनी मात्र महाराष्ट्र व हरियानात पुन्हा आमचे सरकार अधिकारावर येत आहे याविषयी आनंद वाटतो असे सांगितले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही केले.