पणजी : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, अष्टपैलू खेळाडू महेंद्र सिंग धोनीने गोव्यात आपला विकेंड साजरा केला. दोन दिवस त्याचे राज्यात वास्तव्य होते. मात्र, मंगळवारी मोपा विमानतळावरुन धोनी चेन्नईला रवाना होईपर्यंत प्रसारमाध्यांनाही याबाबत समजू शकले नाही. मोरजी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये कुटूंबियांसह माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा, पार्थिव पटेल, झहीर खान हे वास्तव्यास होते.
मंगळवारी महेंद्रसिंग धोनीचे विमानतळावरील फोटो व व्हिडीओ सोशल मीडीयावर प्रचंड वायरल झाले. अनेकांनी फॅन्सनी धोनीसोबत फोटो काढण्याची संधी साधली. आता हे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. काही फोटोंमध्ये महेंद्रसिंग धोनीची पत्नीदेखील दिसत आहे. एका खासगी पार्टीसाठी सर्वजण गोव्यात आले होते असे सांगण्यात आले. याशिवाय सर्वांनी आशिष नेहराच्या येथील घरातदेखील वास्तव्य केले, अशी माहिती समोर आली आहे.
नेहरा हे गेल्या आठवड्यापासून येथे आले होते. पणजी जिमखानाच्या एका कार्यक्रमालादेखील ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहीले. यांदरम्यान त्यांनी पणजी जिमखान्यावर क्रिकेटचे धडे घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनादेखील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जोडूनच या पार्टीचे नियोजन आशिष नेहराकडून करण्यात आले होते असे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी महेंद्र सिंग धोनी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रवाना झाला. यादरम्यान विमानतळ प्रशासनातर्फे धोनी यांना खास भेटवस्तू प्रदान करण्यात आली. तेथील अधिकाऱ्यांनाही धोनीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. धोनीने त्यांनाही निराश केले नाही.