वास्को: दाबोळी विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘स्पाईस जेट’ विमानाची चाके उघडली नसल्याचे ‘रनवे कंट्रोल’ विभागाच्या अधिकाऱ्याला दिसून येताच त्यांनी ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’ विभागाला माहिती देऊन विमानाच्या वैमानिकाला संदेश दिल्याने मंगळवारी (दि. १७) दाबोळी विमानतळावर होणारा मोठा अपघात टळला. ‘स्पाईस जेट’ विमानाची चाके उघडली नसल्याचे कळताच वैमानिकाने धावपट्टीवर विमान न उतरविता उड्डाण घेऊन दुसऱ्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तेव्हा सुद्धा चाके उघडली नसल्याने तिसऱ्यांदा उड्डाण घ्यावी लागली.तिसऱ्या वेळी ह्या विमानाची चाके काही प्रमाणात उघडल्यानंतर सदर विमान दाबोळी विमानतळ धावपट्टीवर सुरक्षितरीत्या उतरविण्यात आले.मंगळवारी सकाळी ७.३० च्या सुमारास सदर घटना घडली. सुरत, गुजरातहून गोव्यात पोचल्यानंतर दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर ‘स्पाईस जेट’ चे (एसजी ३५६८) विमान उतरण्याच्या प्रयत्नात असताना विमानाची चाके (नोझ लँडिंग गियर) उघडली नसल्याचे नौदलाच्या ‘रनवे कंट्रोल’ विभागाचे प्रमुख एअरम रमेश टीग्गा यास दिसून आले. चाके उघडली नसल्याने विमान उतरविल्यास मोठा अपघात घडणार याची जाणीव असल्याने याबाबत त्वरित ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर’ ला माहिती देण्यात आली. यावेळी येथे कामावर असलेले अधिकारी लेफ्टनंट कमांडर हरमीत कौर यांनी त्वरित विमानाच्या वैमानिकाला संपर्क करून चाके उघडलेली नसल्याने विमान धावपट्टीवर न उतरविता पुन्हा उड्डाण घेण्याचा संदेश दिला. त्यानुसार वैमानिकाने पुन्हा उड्डाण घेऊन दुसऱ्यांदा ते धावपट्टीवर उतरविण्याचा प्रयत्न केला, मात्र तेव्हा चाके बाहेर आली नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विमानाला तिसऱ्या वेळी उड्डाण घ्यावी लागली. तिसऱ्यां प्रयत्नात विमानाची चाके काही प्रमाणात बाहेर आल्यानंतर सकाळी ८ च्या सुमारास ‘स्पाईस जेट’ चे विमान सुरक्षितरीत्या दाबोळी विमानतळावर उतरविण्यात आले.यानंतर विमानाला काही धोका निर्माण झाला आहे का याची तपासणी करून प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पूर्ण खात्री करून घेतली. दाबोळी विमानतळावर मंगळवारी सकाळी उतरत असलेल्या ह्या विमानाची चाके उघडलेली नसल्याचे वेळेवरच ‘रनवे कंट्रोल’ विभागाला कळताच व यानंतर त्वरित विमानाच्या सुरक्षेसाठी उचित पावले उचलल्याने येथे होणारा मोठा अनर्थ टळला.याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांना संपर्क केला असता शेवटी विमान सुरक्षितरीत्या दाबोळी विमानतळावर उतरवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सदर स्पाईस जेट चे विमान ‘बंबार्डिअर’ पद्धतीचे असून, ही विमाने छोटी असत असल्याचे संचालक गगन मलिक यांनी माहीती सांगितले. घटनेच्या वेळी या विमानात केवढे प्रवासी होते याबाबत संचालक मलिक यांना विचारले असता या विमानाची प्रवासी हाताळण्याची क्षमता ६० ते ७० च्या आसपास असत असल्याचे सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ‘स्पाईस जेट’ च्या या विमानात झालेला तांत्रिक बिघाड दूर करण्याच्या कामाला नंतर सुरवात करण्यात आली.
नौदलाचा रनवे कंट्रोल विभाग आणि एटीसीच्या सतर्कतेमुळे दाभोळी विमानतळावर टळला मोठा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 6:38 PM