पणजी : मुलींच्या विवाहासाठी ‘लाडली लक्ष्मी’ योजनेखाली दिल्या जाणाऱ्या १ लाख रुपये आर्थिक मदतीसाठी आता उत्पन्नमर्यादा लागू होणार आहे. तसेच गृहिणींना दरमहा १,५00 रुपये मानधन देणाऱ्या ‘गृह आधार’ योजनेतही कडक तरतुदींचा अंतर्भाव केला जाईल. ‘लाडली लक्ष्मी’साठी पालकांचे उत्पन्न वार्षिक ८ लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये, अशी अट लागू केली जाईल. तसेच सरकारी, खासगी क्षेत्रात किंवा बँकांमध्ये काम करणाऱ्या विवाहित महिला ‘गृह आधार’ योजनेस अपात्र ठरतील.
२0१२ साली राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर या दोन्ही योजना सुरु करण्यात आल्या होत्या. भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यात हे आश्वासन दिले होते. त्यानुसार या दोन्ही योजना सुरु करण्यात आल्या होत्या आणि त्याचा लाभ मुली तसेच गृहिणींनी मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे. महिला बाल कल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आतापर्यंत ५४ हजार मुलींनी विवाहासाठी ‘लाडली लक्ष्मी’ योजनेचा लाभ घेतलेला असल्याचे तर १ लाख ५२ हजार गृहिणी ‘गृह आधार’ अंतर्गत दरमहा मानधन घेत असल्याची माहिती दिली.
‘लाडली लक्ष्मी’साठी उत्पन्नाची कोणतीही अट याआधी नव्हती त्यामुळे सरसकट सर्वजण या योजनेचा लाभ घेत असत.आर्थिक स्थिती चांगली असलेल्या पालकांनीही मुलींच्या लग्नासाठी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. सरकारच्या नजरेस हे प्रकार आल्याने आता उत्पन्नमर्यादा घालण्याचे निश्चित केले आहे.‘गृह आधार’साठी वार्षिक ३ लाख रुपये उत्पन्नमर्यादेची अट होती. काही गृहिणी सरकारी किंवा खासगी आस्थापनांमध्ये नोकरी करीत असूनही ‘गृह आधार’चा लाभ घेत असल्याचे आढळून आले होते. अशा गृहिणी शोधून काढण्यासाठी सर्वेक्षणही खात्याने हाती घेतले होते.