लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या येत्या २३ रोजी होणाऱ्या निकालानंतर लगेच गोव्यात काही मोठे राजकीय बदल होणार आहेत, अशी माहिती राजकीय वर्तुळात पसरली आहे. गोवा मंत्रिमंडळातून तिघांना वगळून पूर्ण फेररचना केली जाणार असल्याची चर्चा काही मंत्र्यांपर्यंतही पोहोचली आहे.
भाजपच्या आतील गोटात याची चर्चा रंगली आहे. पण, अधिकृतरीत्या कोणी दुजोरा देत नाही. गणेश चतुर्थीनंतर बदल होतील, असे अगोदर काही नेत्यांनी जाहीर केले होते. पण, बदल झाले नाहीत. आता महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर गोव्यात बदल होतील व काही मंत्र्यांची खाती बदलली जातील. तसेच दिगंबर कामत, नीलेश काब्राल व संकल्प आमोणकर या तीन आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते. अर्थात अजून दिल्लीहून याबाबतची घोषणा झालेली नाही. पण, तसे संकेत मिळत आहेत. काँग्रेसमधून फुटून भाजपात आलेल्या आठ आमदारांमध्ये दिगंबर ) कामत हे ज्येष्ठ आमदार होत.
यापूर्वी त्यांनी २००७ साली काँग्रेसचे सरकार असताना मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. त्यांच्यासोबत फुटून भाजपात आलेले ज्येष्ठ आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद दिले. परंतु भाजपला काहीच राजकीय लाभ त्याद्वारे होत नाही, हे गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी दिसून आले. सिक्वेरा यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन त्या जागी कामत किंवा नीलेश काब्राल यांची वर्णी लागू शकते. मध्यंतरी दिल्लीत एक बैठक झाली होती. गोव्याचे दोन नेते बैठकीत सहभागी झाले होते. त्यावेळी आम्ही निर्णय महाराष्ट्र निवडणुकीनंतर कळवू, असे केंद्रीय नेत्यांनी सांगितले.
गोव्यातील काही मंत्री दिल्लीकडे लक्ष लावून आहेत. काही मंत्री जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनाही भेटून येत आहेत.
असेही बदल शक्य
दरम्यान, आमदार जेनिफर मोन्सेरात यांना पूर्ववत ग्रेटर पणजी पीडीए तसेच लोबो यांना उत्तर गोवा पीडीएचे अध्यक्षपद तरी दिले जावे, असे जेनिफर व लोबो यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. बाबूश मोन्सेरात यांच्याकडे महसूल खाते आहे. ते काढून घेऊन घेऊन त्यांना दुसरे एखादे खाते दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. पण, मध्यंतरी हे खाते सुभाष फळदेसाई यांच्याकडे सोपवले जाईल, अशी चर्चा दिल्लीतील नेत्यांमध्ये होती.
नीलेश काब्राल यांच्या मंत्रिपदासाठी भाजप आग्रही
आमदार नीलेश काब्राल यांचे मंत्रिपद २०२३ मध्ये काढण्यात आले. काब्राल हे कार्यक्षम होते तरी त्यांना डच्चू दिला गेला होता. आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी त्यांना डच्चू दिला होता. काब्राल यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावे, असा आग्रह भाजपमधून वाढत आहे.
आमोणकरांचा विचार
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना मुख्यमंत्री सावंत यांनी बालभवनचे अध्यक्षपद दिले होते. परंतु, त्यांनी हे पद अद्याप स्वीकारलेले नाही. सदस्यता मोहिमेत त्यांनी चांगली कामगिरी केली, त्यामुळे त्यांना मंत्रिपद देण्याबाबत विचार चालू आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संकल्प यांच्या वाढदिनी भाषणात संबोधताना संकल्प यांना मंत्रिपदाची बक्षिसी मिळेल, असे अप्रत्यक्ष संकेत दिले होते.
लोबोंची नजर
दरम्यान, मंत्रिपदासाठी इच्छुक कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे या फेरबदलाच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवून आहेत. त्यांना स्वतःला किंवा पत्नी आमदार डिलायला यांना तरी मंत्रिपद मिळालेले हवे आहे. मंत्रिमंडळ फेररचना न झाल्यास येत्या डिसेंबरपासून आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत ते आहेत. नवीन वर्षात ते आक्रमक होऊ शकतात. लोबो आपला नवीन पक्ष स्थापन करतील, अशी चर्चा आहे. परंतु, लोबो यांनी तशी शक्यता नसल्याचे सांगितले.