पणजी: ताळगाव मतदार संघाने आतापर्यंत बऱ्यापैकी विकास केला आहे. त्यांना आवश्यक गोष्टी खासदार असताना यापूर्वी मी दिल्या आहेत, यापुढे देखील जे आवश्यक आहे, ते त्यांना निश्चित मिळणार आहे. भविष्यात जर निवडून आलो तर तळगावमधील इतर आवश्यक गोष्टी आहेत, त्यांची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन भाजपचे लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी दिले.
श्रीपाद नाईक यांनी गुरुवारी ताळगाव मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार जेनिफर मोंसेरात, दामू नाईक, महापौर रोहित मोंसेरात, जिल्हा पंचायत सदस्य अंजली नाईक व इतर पंच सदस्य, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी श्रीपाद नाईक यांनी सर्व पंच सदस्य आणि नगरसेवकांशी वार्तालाप केला. व समस्या जाणून घेतल्या.
मोंसेरात कुटुंबीयांचा मला नेहमीच पाठिंबा मिळालेला आहे. आणि यापुढेही त्यांचा पाठिंबा मिळणार आहे, याची मला खात्री आहे. लोकसभेसाठी मला तिकीट मिळाल्याने विरोधकांचा आत्मविश्वास डगमगला आहे, यातून ते केवळ लोकांची दिशाभूल करत आहेत. जे नुकतेच राजकारणात आले ते विचारतात की मी गेल्या २५ वर्षात काय केले? ते नुकतेच आल्याने त्यांना माहीत देखील नसणार हे मी समजू शकतो. आम्ही जी कामे २५ वर्षात केली ती लोकांनी पहिली आहेत, त्यामुळे लोकांची दिशाभूल करणे विरोधकांनी टाळावे, असे नाईक यांनी सांगितले.
विरोधकांना ठोस प्रत्युत्तर म्हणजे माझा बहुमताने विजय. यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. आमच्या सरकारने केलेली विकासकामे हाच आमच्यासाठी या लढाईत प्रमुख अस्त्र असणार आहे. भाजप सरकारने केवळ समजाचाच विकास केला नाही, तर लोकांचाही विकास केला आहे. हे लोकांपर्यत पोहचणे आवश्यक आहे. माझा देश, माझे राज्य, माझे गाव हीच भावना मनात ठेऊन मी देखील आतापर्यंत काम केले आहे, याच कामांमुळे मी आज मान वर करून लोकांकडे जात आहे, असेही नाईक यांनी यावेळी सांगितले.
विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या श्रीपाद भाऊ यांनी यावेळी ताळगाव येथील सेंट मायकल चर्चाला भेट देत आशीर्वाद घेतला, व नंतर त्यांनी शापोल येथील मार्केटला भेट देत विक्रेत्यांशी चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनतर त्यांनी ओडशेल येथील श्री लक्ष्मी देवस्थानला भेट देत देवीचे दर्शन घेतले, व तेथील देवस्थान समितीच्या सदस्यांशी वार्तालाप केला.