ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 22- गोवा विधानसभेची निवडणूक म्हणजे केवळ निवडणूक नाही, ते एक आंदोलन आहे. गोवा भ्रष्टाचारात बरबटलेला आहे. गोव्यातील भाजप सरकारने काँग्रेसची भ्रष्ट राजवटच पुढे चालू ठेवली आहे. भ्रष्टाचार, कॅसिनो आणि खाणींच्या प्रश्नांबाबत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवेकरांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी येथे केली.
गोवा भ्रष्टाचारमुक्त करण्याची ग्वाही त्यांनी दिली. येथील कांपाल मैदानावर केजरीवाल यांची जाहीर सभा झाली. ‘आप’तर्फे सहा महिने येथे जोरदार प्रचार मोहीम राबवली जात आहे. चाळीसही मतदारसंघांत आपचे उमेदवार उभे केले जातील, असे पक्षाने यापूर्वी जाहीर केलेले आहे. सर्व मतदारसंघांत आपचे समन्वयक जाहीर झालेले आहेत. हेल्पलाईन क्रमांकही लोकांना दिलेला आहे. मतदारांच्या व्यक्तिगत गाठीभेटींवर पक्षाने भर दिलेला आहे. त्यासाठी दारोदारी पक्षाचे कार्यकर्ते जात आहेत. या सर्वांचा परिणाम आजच्या सभेच्या लक्षणीय उपस्थितीत झाला. केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये पक्षाची झालेली वाटचाल कथन केली. माध्यमांसह सर्व पक्षांनी आमच्या पक्षाची कशी खिल्ली उडवली ते सांगितले. तसेच आपच्या सर्व उमेदवारांची अनामत जप्त होईल, अशी भाकिते रंगवली, अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, ते माझी टिंगल करत नव्हते तर आम आदमीच्या ताकदीची टिंगल करत होते. या आम आदमीच्या मनात भ्रष्टाचाराच्या विरोधात असंतोष धगधगत होता. तो निकालातून दिसून आला, गोव्यातही हे होऊ शकते. केजरीवाल यांनी स्वत:च्या मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या विषयावरून कसे हाकलले तो अनुभव सांगितला. आम्ही त्याला वाचवू शकलो असतो; पण तोच काय, माझा मुलगा जरी असला तरी मी माफ करणार नाही, असे त्यांना ठणकावून सांगितले.
स्वत:च्या मंत्र्याला लाच घेतली म्हणून नव्हे तर लाच मागितली म्हणून आम्ही सीबीआयच्या स्वाधीन केले, देशाच्या इतिहासात हे प्रथमच घडले. केजरावील यांच्या सभेला लक्षणीय उपस्थिती होती. तळपत्या उन्हात लोक तीन-चार वाजल्यापासून आले होते. महिलांची संख्याही खूप होती. आम आदमी जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद यासारख्या गाण्यांनी परिसर दणाणून सोडला होता. प्रारंभी आपच्या गोव्यातील स्थानिक कार्यकर्त्यांची भाषणे झाली. त्यांनी सत्तारूढ भाजप सरकारचे वाभाडे काढले. या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी काय सांगितले आणि प्रत्यक्ष यू टर्न कसे घेतले, याचा पाढा वक्त्यांनी वाचला.