गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी कोविड चाचणी सक्तीची करा; महिला काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 05:12 PM2021-04-16T17:12:45+5:302021-04-16T17:13:31+5:30
राज्यात कोविडचा फैलाव वाढल्याने सरकारने पर्यटकांना आरटीपीसीआर कोविड चांचणी सक्तीची करावी, अशी महिला काँग्रेसची मागणी आहे.
पणजी : गोव्यात येणार्या पर्यटकांसाठी कोविड चांचणी सक्तीची करावी, अशी मागणी करणारे निवेदन महिला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना सादर केले आहे.
महिला प्रदेशाध्यक्षा बीना नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश महिला सचिव प्रिया राठोड, मुक्तामाला फोंडवेकर, रोशन देसाई, पार्वती नागवेंकर, रेखा परब, संजना कौलगे व प्रतिभा बोरकर ढगे यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
राज्यात कोविडचा फैलाव वाढल्याने सरकारने पर्यटकांना आरटीपीसीआर कोविड चांचणी सक्तीची करावी, अशी महिला काँग्रेसची मागणी आहे.
त्या म्हणाल्या की, रस्ता मार्गे तसेच हवाई, रेल व समुद्रमार्गे गोव्यात येणार्या पर्यटकांना राज्यात प्रवेश करताना कोविड निगेटिव्ह दाखला सक्तीचा असायला हवा.
शेजारी महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये कोविड झपाट्याने वाढत आहे. गोव्याला भेट देणारे पर्यटक महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे पर्यटकांसाठी कोविड चाचणी सक्तीची आहे, असे महिला काँग्रेसचे म्हणणे आहे.
महाकुंभमेळ्यास उपस्थिती लावलेल्यांना सक्तीचे क्वारंटाइन करावे
हरिद्वार येथे महाकुंभमेळ्यात १२०० भाविक पॉझिटिव्ह आढळून आले. या कुंभमेळ्यात उपस्थिती लावून जर कोणी गोव्यात परतला असेल तर त्या व्यक्तीला पंधरा दिवस तरी सक्तीचे क्वारंटाइन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.