म्हापसा : प्लॉस्टिकपासून वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्लॉस्टिकचा वापर बंद करून होणारे प्रदूषण नियंत्रित ठेवणे हे सरकारच्या हाती असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या संदर्भात योग्य तो कायदा करावा, अशी मागणी आपण त्यांच्याकडे करणार असून एका महिन्याच्या आत जर या कायद्याची कार्यवाही सरकारकडून झाली नाही तर उपोषणासारख्या अस्त्राचा वापर करणार असल्याचे उपसभापती तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी म्हटले आहे. म्हापसा येथील सेंट ब्रिटो हायस्कूलच्या मैदानावर बार्देस तालुक्यातील स्काऊट अॅण्ड गाईडने म्हापसा नगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या समारोपाला प्रमुख पाहुणे या नात्याने मार्गदर्शन करताना लोबो बोलत होते.
विद्यार्थ्यांनीच आपल्या पालकांना या संदर्भात सुशिक्षीत करायचे आहे. होणारे प्रदूषण टाळण्याचे काम विद्यार्थीच करू शकतात. पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान याचसाठी सुरू केले आहे. महात्मा गांधीचेही तेच स्वप्न होते. कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य आहे. हे कळंगुट येथे उभारण्यात आलेल्या कचरा प्रकल्प पाहिल्यानंतर दिसून येते. आमच्या सवयी बदलल्या तर आपण आपला परिसर, गाव आणि राज्य स्वच्छ ठेऊ शकतो. प्रदूषण विरहीत करू शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्लास्टीक मुक्त राज्य करायचे असल्यास सरकारने त्याकामी पुढाकार घेणे आवश्यक असून प्लास्टीकच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी योग्य तो कायदा करावा अशी मागणी लोबो यांनी केली. सदर कार्यक्रमाला त्यांच्या सोबत म्हापसा नगराध्यी रोहन कवळेकर, माजी नगराध्यक्ष संदीप फळारी, नगरसेवक सुधीर कांदोळकर, नगरसेविका कविता आर्लेकर, आशिष शिरोडकर, प्रा. सॅड्रीक फर्नांडिस तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
म्हापशातील स्काऊट अॅण्ड गाईडच्या मुलांनी पालिकेच्या विसही प्रभागांत फिरून घरोघरी जाऊन प्लॉस्टिकच्या वापराचे दुष्परिणाम यावर जनजागृती केली होती. त्यानिमित्त हा समारोप सोहळा आयोजित करण्यात आलेला.