म्हापसा : जगप्रसिद्ध कळंगुट किना-यावर राजरोसपणे घडणा-या विविध घटनांवर नियंत्रण ठेवून पर्यटकांना चांगले वातावरण उपलब्ध करुन देण्यासाठी किना-यावरील व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने ठेवण्यासाठी पंचायतीने पुढाकार घेऊन किनारा व्यवस्थापन समिती या नावाने व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला आहे.
पर्यटकांना चांगल्या प्रकारचे वातावरण उपलब्ध व्हावे, त्यांना होणारा त्रास, अडचणी दूर व्हाव्यात व त्यांना उत्तम प्रकारे किना-याचा आनंद मिळावा यासाठी व घडलेल्या प्रकारावर लागलीच नियंत्रण मिळावे. एकंदरीत कळंगुटचे व्यवस्थापन चालवण्याच्या उद्देशाने हा गु्रप तयार करण्यात आला असल्याची माहिती पंचायतीच्या वरिष्ठ अधिका-याने दिली.
या किनारी भागाशी संबंध येणा-या प्रत्येक व्यक्तीचा अधिका-याचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे. पंचायतीने पुढाकार घेवून तयार केलेल्या या ग्रुपचे अॅडमिन सरपंच आहेत. त्यात कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यापासून पर्यटन खात्याचे संचालक, कळंगुटचे पोलीस तसेच वाहतूक निरीक्षक, किना-यावर देखरेख ठेवणारे राखीव पोलीस दलाचे अधिकारी, दृष्टीचे अधिकारी, काही निवडक शॅकचे मालक, वैद्यकीय अधिकारी, जल क्रीडा आयोजक, कचरा गोळा करणारा कंत्राटदार तसेच इतर संबंधीत व्यवसायिकांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.
किना-याचा आनंद लुटण्यासाठी येणा-या लोकांशी, पर्यटकांशी संबंधीत अनेक घटना घडत असतात. ज्या काहीवेळा लागलीच कळल्या तर नियंत्रणात आणल्या जावू शकतात. अनेकवेळा किना-यावरील भटक्या विक्रेत्यांपासून, वाईट उद्देशाने किना-यावर भटकणा-या लोकांपासून पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. काहीवेळा त्यांच्या सामानाची चोरी केली जाते अशा घटना लक्षात येताच तातडीने हालचाली करुन त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होत असते. एखादी विपरीत दुर्घटना घडल्यास त्या संबंधी प्राथमिक उपचार पुरवण्यासाठी सुद्धा हालचाली करण्यासाठी पावले उचलणे शक्य होत असल्याने हा उद्देश मनात ठेवून हा ग्रुप बनवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेला हा गु्रप अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. त्यातून ब-याच समस्यांचे निरसन सुद्धा करण्यात आले आहे. तसेच ग्रुप तयार केल्या पासून सुधारणा करण्याच्या दृष्टीने ब-याच सुचना सुद्धा त्यातून समोर आल्या असल्याची माहिती पंचायतीकडून देण्यात आली आहे. आलेल्या सुचनांची सुद्धा अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत गु्रपचा उद्देश सफल झाला असल्याचे पंचातीचे म्हणणे आहे.