पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्वादूपिंडाला (पॅनक्रिया) सूज आल्यामुळे ते मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. तथापि, सोमवारी (19 फेब्रुवारी )विधानसभा अधिवेशन सुरू असून येत्या 22 रोजी विधानसभेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असून ते अधिवेशनावेळी उपस्थित राहतील, असे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री पर्रीकर गेल्या तीन दिवसांपूर्वी मुंबईच्या लिलावती इस्पितळात दाखल झाले. त्या दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सौम्य पॅनक्रियाटीटीस झाल्याचे अगोदर जाहीर करण्यात आले होते. त्यांच्या स्वादूपिंडाला सूज असल्याचे व ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असल्याचे सरकारकडून शनिवारी जाहीर केले गेले. लिलावती इस्पितळाने मात्र अधिकृतरित्या कोणतेच भाष्य केलेले नाही किंवा पत्रक जारी केलेले नाही. पर्रीकर यांची प्रकृती सुधारत असल्याचे सरकारचे म्हणणो आहे.
22 फेब्रुवारी अर्थसंकल्प मांडणार
मुख्यमंत्री पर्रीकर यांना विश्रांतीची व उपचारांचीही गरज आहे. तरी देखील ते येत्या 22 रोजी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील, अशी माहिती सुत्रंकडून मिळाली. पर्रीकर यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली नाही किंवा तसा सल्लाही त्यांना दिला गेलेला नाही. मात्र त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या असून तज्ज्ञ डॉक्टरांचे त्यांच्या स्थितीवर लक्ष आहे. विधानसभा अधिवेशन जरी सोमवारी सुरू होत असले तरी, सोमवारी यायला जमले नाही तर मुख्यमंत्री 22 फेब्रुवारी येतील व अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर ते पुन्हा जाऊ शकतात. तूर्त याविषयी स्पष्टता नाही.
पर्रीकर यांची गोव्यातील काही मंत्र्यांनी, भाजपा पदाधिका-यांनी मुंबईत भेट घेतली आहे. सभापती डॉ. प्रमोद सावंत हे पाटणा येथे होते. दूरध्वनीवरून शनिवारी मुख्यमंत्री सभापती सावंत यांच्याशी बोलले. अर्थसंकल्पाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. त्याविषयी दूरध्वनीवरून काही वरिष्ठ प्रशासकीय अधिका:यांशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.
बजेट सभागृहात ठेवता येते
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका सोहळ्य़ानिमित्ताने रविवारी मुंबईत येत आहेत. त्यावेळी ते लिलावतीला भेट देण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक आहे. त्यांचे लक्ष अर्थसंकल्पावर आहे. राज्याचा 2018-19 सालासाठीचा अर्थसंकल्प 22 रोजी यापूर्वी ठरलेल्या वेळापत्रकानुसार विधानसभेत मांडला जाईल. तो मांडण्यासाठी पर्रीकर आल्यानंतर पुन्हा उपचारांसाठी ते मुंबईला जातील, असे सूत्रांनी सांगितले. सभापती डॉ. सावंत यांनी शनिवारी उशीरा पाटणाहून मुंबई गाठले व र्पीकर यांची भेट घेतली. र्पीकर यांनी जर अर्थसंकल्प मांडला नाही तर तो विधानसभेच्या पटलावरही ठेवता येतो. तो वाचूनच दाखवायला हवा असे काही नाही. किंवा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर दुसरा एखादा मंत्री तो विधानसभेत वाचून दाखवू शकतो.
पूर्वी ठरल्यानुसार विधानसभा अधिवेशन हे 22 फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीसाठी आहे. तथापि, सरकारला वाटल्यास अधिवेशनाचा कालावधी कमी करता येतो. त्यासाठीची प्रक्रिया पार पाडणो हे सरकार व सभापतींच्या हाती आहे. विधानसभेत मांडण्यासाठी शेकडो प्रश्न सादर झाले आहेत. विरोधी काँग्रेस पक्षाने खाण, म्हादई पाणी, कोळसा प्रदूषण, जलमार्गाचे राष्ट्रीयीकरण, कॅसिनो, सरकारने यापूर्वी दिलेली विविध आश्वासने यासंबंधी प्रश्न सादर केले आहेत.